

Pune Politics: महाविकास आघाडीचा जाहीरनामा म्हणजे लबाडा घरचे आमंत्रण आहे. किती खोटे बोलावे... काँग्रेसने तर त्याची परिसीमाच गाठली आहे. तीन राज्यांत त्यांचे सरकार आले पण तेथेही त्यांनी अशाच भूलथापा दिल्या, एकही वचन पूर्ण केले नाही, अशी बोचरी टीका भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे केली.
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे जाहीरनामे रविवारी जाहीर झाले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पत्रकार परिषद घेत जावडेकर यांनी बोचरी टीका केली. ते म्हणाले, हिमाचल प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटक या तीन राज्यांत काँग्रेसची सत्ता आहे. पण त्यांनी दिलेले एकही वचन पाळले नाही. या तिन्ही राज्यांत काँग्रेसमुळे बेरोजगारी वाढल्याचा आरोप त्यांनी केला. (Prakash Javadekar News)
जावडेकर म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यंतरी एक लेख लिहून देशातील ठरावीक उद्योगांनाच वाव मिळतो, असे लिहून देशाची बदनामी केली. उलट मोदी सरकारच्या काळात एक लाख 40 हजार नवे स्टार्टअप सुरू झाले. उद्योगांचे लोकशाहीकरण झाले. सर्वांना उद्योग करायला आता खर्या अर्थाने प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे मतदार महायुतीला प्रचंड मोठा विजय देतील, असा मला विश्वास आहे. महायुतीला राज्यात 150 पेक्षा जास्त जागा मिळतील.
अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला अन् लगेच त्यांना पक्षात घेत उपमुख्यमंत्री केले? ही युती अनैसर्गिक नाही का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर जावडेकर म्हणाले, अजित पवार यांना पक्षात घेतले नाही, त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. त्यांच्याशी युती केली, त्यात काहीही गैर नाही. त्यांच्यावरील जे आरोप होते, त्याची चौकशी थांबविलेली नाही.