

लोणी काळभोर: जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा बँकेचे संचालक, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रदीप कंद यांची भारतीय जनता पक्षाच्या उत्तर पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पुणे जिल्हा उत्तरच्या अध्यक्षपदी कंद यांची निवड करण्यात आली आहे.
प्रदीप कंद हे हवेली तालुक्यातील लोणीकंद येथील रहिवासी असून, त्यांनी आपली राजकीय कारकीर्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुरू केली. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. (Latest Pune News)
भारतीय जनता पक्षात प्रवेश करून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून ते जिल्ह्यात कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना कंद यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर आमदारकी लढविण्याची तयारी केली होती.
परंतु, युतीच्या जागावाटपामध्ये शिरूर-हवेली मतदारसंघ अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला गेल्याने त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. युती धर्म पाळून लगेच निवडणुकीच्या कामास सुरुवात केली आणि महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांचा कसून प्रचार केला.
परिणामी, शिरूर-हवेली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले. या निवडणुकीत ज्ञानेश्वर कटके यांच्या खांद्याला खांदा लावून ते निवडणूक प्रचारात फिरले. त्यांच्या या कार्याची पक्षाकडून दखल घेऊन त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.