मंचर: सातगाव पठार (ता. आंबेगाव) येथील कोल्हारवाडी येथे चक्रीवादळाने धुमाकूळ घातला. प्रगतशील शेतकरी जयसिंगशेठ एरंडे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये चक्रीवादळासह पावसाचे पाणी आत घुसल्याने पोल्ट्रीतील सहा हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने अंदाजे चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 13) दुपारी घडली.
कोल्हारवाडी येथे पावसासह चक्रीवादळासारखा प्रकार पाहावयास मिळाला. दुपारी एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान सुरू झालेल्या पावसामध्ये चक्रीवादळ देखील आल्याने ते कोल्हारवाडी येथील शेतकरी जयसिंग एरंडे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये घुसले. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात पोल्ट्रीमध्ये साचल्याने पोल्ट्रीतील सुमारे 13 हजार कोंबड्यांपैकी जवळपास 6 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. (Latest Pune News)
जयसिंग एरंडे यांच्या शेतात दोन पोल्ट्री फार्म असून, एका पोल्ट्रीमध्ये 7 हजार तर दुसर्या पोल्ट्रीमध्ये 6 हजार कोंबड्या आहेत. हे पक्षी एक ते दोन आठवड्यांचे असून पोल्ट्रीला चारही बाजूने दोन फुटाच्या भिंती असल्याने पाणी बाहेर जाण्यास जागा उपलब्ध नाही.
अचानक आलेले चक्रीवादळ आणि पावसाच्या पाण्यात सर्व पक्षी भिजल्याने आतापर्यंत सहा हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला असून उर्वरित सात हजार कोंबड्या गारठल्याने त्यामधील काही कोंबड्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण सुरू झाले आहे. सर्व पक्षी भिजल्याने जवळपास 80 टक्के कोंबड्या मृत्युमुखी पडण्याची शक्यता जयसिंग एरंडे यांनी वर्तवली आहे.
वेळ नदीला पूर
सातगाव पठार भागात सोसाट्याच्या वार्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. पेठ, पारगाव भागातून जाणार्या वेळ नदीलादेखील पूर आला होता.
एक कोंबडी 35 रुपयांना खरेदी केला असून, त्यांच्यासाठी 18 ते 25 रुपयांचे खाद्य आणि औषधे देण्यात आली. परंतु, कोंबड्या वाढत असताना अचानक वादळी वार्याने गारठून मरत आहेत. त्यामुळे अंदाजे चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाने भरपाई द्यावी.
जयसिंगराव एरंडे, पोल्ट्रीचालक, कोल्हारवाडी