वाघोली : पुढारी वृत्तसेवा : नवबौद्धांसाठी वाघोली बाजारतळ मैदानात असणार्या स्मशानभूमीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी विद्युतपुरवठा नाही, सुरक्षारक्षक नाही तसेच परिसरात कचराही साचला आहे. नुकत्याच निधन झालेल्या एका व्यक्तीवर या स्मशानभूमीत अंधारातच अंत्यसंस्कार करावे लागल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
महापालिकेमध्ये वाघोलीचा समावेश होऊन अडीच वर्षे होत आली असताना सुविधांसाठी नागरिकांना झगडावे लागत असल्याचा प्रत्यय वाघोलीतील नागरिकांना येत आहे. सिद्धार्थनगर येथील एका मृत व्यक्तीच्या देहावर नागरिक बाजारतळ मैदानातील स्मशानभूमीत नुकतेच रात्री अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले असता विद्युतपुरवठा नसल्याने अंधारातच अंत्यसंस्कार करावे लागले. स्मशानभूमीत विद्युतपुरवठा आणि सुरक्षारक्षकही नाहीत तसेच सभोवताली कचराही साचला आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या स्मशानभूमीत विद्युतपुरवठाच नसल्याने अंधारातच अंत्यसंस्कार करावे लागले. या स्मशानभूमीची विदारकस्थिती झाली आहे. वाघोली गावात लाखो रुपयांचे पथदिवे बसविले असताना स्मशानभूमीत विद्युतपुरवठा नसणे विरोधाभास आहे. महापालिकेने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
– सचिन वाघमारे, रहिवासी, वाघोली.
हेही वाचा