

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात नागापूर, थोरांदळे परिसरात बटाटे काढणीची कामे सुरू आहेत. काढणी झालेल्या शेतांमध्ये जाऊन जमिनीतील शिल्लक राहिलेले बटाटे उकरून ते आजूबाजूच्या गावांमध्ये घरोघरी विकून चांगला रोजगार मिळवताना भिल्ल, फासेपारधी समाजातील महिला व पुरुष दिसत आहेत.
तालुक्याच्या पूर्व भागात थोरांदळे, नागापूर, वळती, रांजणी या गावांमध्ये बटाटा पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात. यंदा देखील बटाटा पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. सध्या थोरांदळे, नागापूर, रांजणी या गावांमध्ये बटाटे काढण्याची कामे सुरू आहेत. या भागात भिल्ल, फासेपारधी समाजातील महिला, पुरुष दरवर्षी बटाटे काढणीच्या हंगामात जमिनीत शिल्लक राहिलेले बटाटे उकरून घेऊन जातात.
ते आजूबाजूच्या गावांमध्ये घरोघरी विकतात. त्यातून ते चांगला रोजगार मिळवतात. पहाटेच्या प्रहरी हे महिला, पुरुष बटाटे काढणी झालेल्या शेतांमध्ये जमिनीतील बटाटे उकरून काढतात. शेतकरी देखील त्यांना काही बोलत नाहीत. बटाट्यांना सध्या किरकोळचे भाव 30 रुपये किलो आहे. हे त्यांना परवडणारे असल्याचे हे लोक सांगत आहेत.