पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 500 पोलिस पाटलांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र, कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने स्थगिती देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नव्याने भरती प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. पोलिस पाटील हे पद गावातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील 500 गावांमध्ये हे पद रिक्त आहे. ही पदे भरण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
त्यानुसार 2 फेब्रुवारीपासून प्रांत कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येणार होते. मात्र, कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ हे हवेली तालुक्यात येत असल्याने संपूर्ण भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे.
फपोलिस पाटलांची पदे रिक्त असल्याने गावागावांतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्रशासनाला अपयश येत आहे. त्यामुळे पदे भरण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने रिक्त पदांची माहिती संकलित केली आहे. त्यानुसार पुणे शहर प्रांत कार्यालयांतर्गत 25, हवेली 50, भोर-वेल्हा 125, मावळ-मुळशी 92, दौंड-पुरंदर 39, जुन्नर-आंबेगाव 87, बारामती- इंदापूर 47
अशी एकूण 500 पदे भरली जाणार आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून, चिंचवड हे हवेली तालुक्यात आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्याने निवड प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
– संजय तेली,
उपजिल्हाधिकारी, पुणे