सकारात्मक बातमी ! राज्यातील बालमृत्यू प्रमाणात घट

सकारात्मक बातमी ! राज्यातील बालमृत्यू प्रमाणात घट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, राज्यातील बालमृत्यूच्या दरात घट होत असल्याचे दिसून आले आहे. अहवालानुसार, 2018 मध्ये राज्याचा नवजात बालकांचा मृत्यू दर हा प्रति 1000 जिवंत जन्मामागे 13 इतका होता. आता तो 11 पर्यंत कमी झाला असून बालमृत्यू दर हा प्रति 1000 जिवंत जन्मामागे 22 वरून 18 झाला आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयानुसार, 2030 पर्यंत नवजात मृत्यू दर 12 पेक्षा कमी करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलेे. महाराष्ट्राने हे उद्दिष्ट 2020 मध्येच गाठले. राज्यात राबविण्यात आलेल्या विविध माता व बाल आरोग्य संबंधित कार्यक्रमांमुळे बालमृत्यू कमी झाल्याचे दिसून आले.

नवजात बालमृत्यू कमी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये 53 विशेष नवजात शिशू काळजी कक्ष स्थापन करण्यात आले. दरवर्षी अंदाजे 50,000 ते 60,000 आजारी नवजात शिशू तसेच कमी वजनाच्या बालकांवर उपचार केले जातात. कक्षामध्ये कांगारु मदर केअर पध्दतीचा वापर करण्यात येतो. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमा अंतर्गत 0 ते 1 वर्षांच्या बालकांवर मोफत उपचार, आहार, संदर्भ सेवा सुविधा देण्यात येतात.

या उपाययोजना केल्या जातात…

  • आशांद्वारे राज्यातील सर्व नवजात बालकांची गृह भेटीद्वारे आरोग्याची तपासणी व गंभीर बालकांना उपचारासाठी संदर्भित करण्यात येते. या कार्यक्रमा अंतर्गत दरवर्षी अंदाजे 10,00,000 नवजात शिशुंना गृहभेटी देण्यात येतात. अंदाजे 90,000 आजारी बालकांचे निदान करुन उपचार व संदर्भ सेवा देण्यात येते.
  • आदिवासी दुर्गम कार्यक्षेत्रात वैदयकीय अधिकारी यांच्या 281 भरारी पथकाव्दारे अति जोखमीच्या माता व बालके यांचे निदान करुन उपचार करण्यात येतात.
  • कुपोषित बालकांच्या उपचाराकरीता जिल्हा पातळीवर 46 पोषण पुर्नवसन केंद्र तसेच आदिवासी कार्यक्षेत्रात तालुका पातळीवर 27 बाल उपचार केंद्र कार्यान्वित असून गंभीर व तीव्र आजारी (सॅम) कुपोषित बालकांना दाखल करून तपासणी, उपचार दिला जातो.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news