वडगाव मावळ : लोकसंख्या वाढतेय; बाजारपेठ, अर्थकारण मात्र संथच !

वडगाव मावळ : लोकसंख्या वाढतेय; बाजारपेठ, अर्थकारण मात्र संथच !
Published on
Updated on

वडगाव मावळ : मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या मानाने येथील अपुरी बाजारपेठ, भाजी मंडई यामुळे शहरातील व्यापारीकरण वाढताना दिसत नाही. परिणामी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सहकार क्षेत्र वाढले असताना वडगाव शहरात मात्र सहकारी संस्थांचीही उणीव भासत आहे.

बाजारपेठेवर परिणाम
वडगाव मावळ येथील बाजारपेठ व आठवडे बाजार हा प्रामुख्याने आंदर मावळ, नाणे मावळ भागातील नागरिकांच्या दृष्टीने सोयीचा होता. कालांतराने कामशेत, टाकवे बुद्रुक येथे आठवडे बाजार सुरू झाले, कामशेतची बाजारपेठ मोठी झाली आणि याचा परिणाम वडगाव शहराच्या बाजारपेठेवर व आठवडे बाजारावर झाला होता. अलीकडच्या काळात शहराची लोकसंख्या वाढली असून बाजारपेठेतील दुकानांमध्येही वाढ झाली आहे. बाजारपेठेतील रस्ताही मोठा झाला. परंतु, बहुतांश व्यापार्‍यांच्या संकोचित वृत्तीमुळे तसेच अजूनही बाजारपेठेत नागरिकांना अपेक्षित बाबी, अपेक्षित दराप्रमाणे मिळत नाही.

खरेदीसाठी नागरिकांचा कल तळेगाव, पिंपरीकडे
शहरातील व्यापारी वर्गही वाढत्या नागरिकरणाच्या दृष्टीने अपेक्षित बदल करताना दिसत नाही. अजूनही इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्टेशनरी, हार्डवेअर अशा गरजेच्या वस्तूंची दुकाने, मॉल्स वडगावमध्ये नाहीत अथवा बहुतांश वस्तू अजूनही वडगावच्या बाजारपेठेत मिळत नाही. याचा परिणाम ग्राहकांवर होत असून ग्राहक तळेगावमध्ये अथवा पिंपरी चिंचवडला खरेदी करायला जाण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे वडगाव शहराच्या बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहारांवर याचा परिणाम होत आहे.

केवळ सरकारी कार्यालयात वर्दळ
येथे असलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये तालुक्यातील नागरिक विविध कामांसाठी वडगाव शहरात येतात. त्यामुळे येथील मुख्य चौक व बाजारपेठ गजबजलेली असते. परंतु, आठवड्यातील शनिवार, रविवार अथवा शासकीय सुटीचा दिवस आला की वडगाव शहरातील बाजारपेठ ओस पडल्याचे चित्र आजही पाहायला मिळते. यावरून शहरातील बाजारपेठ ही कामानिमित्त बाहेरून येणार्‍या नागरिकांवर अवलंबून असल्याचे दिसते.

बाजारपेठेतील वाहतूककोंडी नित्याची
मुख्य बाजारपेठेत सातत्याने होणारी वाहतूककोंडीही यासाठी कारणीभूत आहे. बाजारपेठेतील रस्ता मोठा झाला असला तरी दुकानदारांनी दुकानांपुढे लावलेल्या वस्तू, रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने, दुकानांपुढे ग्राहकांनी लावलेल्या दुचाकी यामुळे या रस्त्यावर वाहतूककोंडी हा नित्याचाच प्रश्न झाला असून, याचाही परिणाम बाजारपेठेतील व्यवसायांवर होत आहे. परंतु, ही बाब स्वतः दुकानदारही गांभीर्याने घेत नाही व प्रशासनही ठोस उपाययोजना करत नाही.

सहकार क्षेत्रही झाले कमजोर
शहरातील व्यापारीकरणाचा विस्तार होत नसल्याने येथील आर्थिक उलाढालही वाढत नाही. त्यामुळे सहकार क्षेत्रही कमजोर असल्याचे दिसते. सहकारी संस्थांचे जनक असलेले सहाय्यक निबंधक कार्यालय हे याच ठिकाणी असले तरी वडगाव सोसायटी, भैरवनाथ ग्रामीण पतसंस्था, ऐश्वर्यलक्ष्मी नागरी पतसंस्था, मोरया नागरी पतसंस्था या मोजक्याच सहकारी संस्था आहेत. तळेगाव शहरातील नामवंत पतसंस्थांनी सोमाटणे, कामशेत येथे शाखा सुरू केल्या आहेत. परंतु, वडगाव शहराला मात्र डावलले हे विचार करण्यासारखे आहे. एकंदर एकीकडे वडगाव शहराची लोकसंख्या वाढतेय. परंतु, त्या तुलनेत बाजारपेठमधील व्यापारीकरणाचा विस्तार मात्र होत नसल्याने बाजारपेठ अन त्याबरोबर सहकारही संथ गतीने असल्याचे दिसत आहे.

भाजी मंडईची कमी
येथील आठवडे बाजार जुन्या काळापासून भरत आला आहे. अलीकडच्या काळात बाजारामध्ये ग्राहकांची संख्या व त्या तुलनेने विक्रेत्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, आजतागायत आठवडे बाजारासाठी सुसज्ज भाजी मंडई ग्रामपंचायत अथवा नगरपंचायतच्या माध्यमातून उभारली गेली नाही ही शोकांतिका आहे. आठवडे बाजाराव्यतिरिक्त इतर दिवशी ताजा भाजीपाला आजही शहरात मिळत नाही, नाईलाजाने नागरिक भाजी घेण्यासाठीही तळेगावलाच जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news