Pooja Khedkar | पुजा खेडकरच्या वैद्यकीय शिक्षणासंदर्भात महत्त्वाची माहिती आली समोर
पुढारी ऑनलाईन डेस्क: प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचा शेतकऱ्याला दमदाटी करणारा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर पुजा खेडकर आणि कुटुंबिय वादाच्या भोवऱ्यात अडकले. दरम्यान तिच्या वैद्यकीय शिक्षणासंदर्भातील माहिती आता समोर आली आहे. श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि सामान्य रुग्णालय संचालक अरविंद भोरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
शारीरीकदृष्ट्या विकलांग असल्याचा उल्लेख नाही
नवले वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक अरविंद भोरे म्हणाले, पूजा खेडकर हिने २००७ मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला, यासाठी तिला CET द्वारे प्रवेश मिळाला होता. तेव्हा तिने आरक्षणाची काही प्रमाणपत्रे दिली होती. यावेळी तिने जात प्रमाणपत्र, जात वैधता आणि नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर केले होती. दरम्यान तिने फीटनेस सर्टिफिकेट देखील सादर केले होते. परंतु यामध्ये पूजा खेडकर या कोणत्याही प्रकारे शारीरीकदृष्ट्या विकलांग असल्याचा उल्लेख नसल्याची माहिती अरविंद भोरे यांनी दिली आहे.
पूजा खेडकरच्या आई-वडिलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल
जिल्हाधिकारी कार्यालयात रुबाब दाखविणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांचे एक- एक कारनामे बाहेर येत आहेत. पूजाच्या आईने जमीन खरेदीच्या वादातून शेतकऱ्यांनाच चक्क पिस्तूल दाखविले असल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पूजाची आई मनोरम खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यासह इतर ५ जणांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसाात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.
