नायगाव (ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : पोंढे गावच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या राजुरी-पोंढे ते वाघलेवस्ती या रस्त्यासाठी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल सात कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला आहे. या निधीमुळे पोंढे-यवत या जुन्या घाट रस्त्याचा देखील मार्ग मोकळा झाला आहे. हा 7 कोटींचा निधी पोंढे गावच्या विकासासाठी 'टर्निंग पॉइंट' ठरला आहे; म्हणून पोंढे ग्रामस्थांनी विजय शिवतारे यांचे विशेष कौतुक करीत त्यांचा सत्कार केला.
पोंढे येथील ग्रामस्थांना दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी यवत (ता. दौंड) या ठिकाणी रोजच ये-जा करावी लागते. यासाठी 18 ते 20 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. पोंढे गावातून वाघलेवस्तीमार्गे जुन्या घाटातून यवत असा जवळचा केवळ 7 ते 8 किलोमीटर अंतराचा रस्ता आहे. या रस्त्यावरील घाटातील एक किलोमीटर रस्ता वन विभागात असल्याने व त्याची पडझड झाल्याने तो रस्ता बंद आहे.
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राजुरी-पोंढे ते वाघलेवस्ती या रस्त्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला आहे. वाघलेवस्तीमार्गे पुढे हाच रस्ता जुन्या घाटातून यवत गावाला जोडला जाणार आहे. यामुळे पोंढे गावच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेला व अनेक वर्षांपासून बंद असलेला पोंढे-वाघलेवस्ती-यवत मार्गावरील जुना घाट रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मतदान न बघता निधीचे वाटप
निधी वाटप होत असताना आपल्याला त्या गावातून किती मते मिळाली, याचे गणित पाहूनच गावांना विकास निधी दिला जातो. मात्र, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मात्र पोंढेतून आपल्याला किती मतदान झाले, हे ना पाहता या रस्त्यासाठी सात कोटींचा निधी मिळवून दिला. यामुळे पोंढे ग्रामस्थांनी शिवतारे यांचे विशेष आभार मानले आहेत.