

टाकळी हाजी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील पश्चिमपट्टा हा डाळिंब पिकासाठी प्रसिद्ध आहे. टाकळी हाजी, माळवाडी, कवठे येमाई, मलठण, निमगाव दुडे, म्हसे, वडनेर या गावांमध्ये डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. डाळिंब पंढरी म्हणून ओळख असलेल्या टाकळी हाजीतील अनेक बागा तोडणीसाठी तयार असून, व्यापार्यांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.
डाळिंब खरेदीसाठी बांगलादेश, नाशिक, संगमनेर, सांगोला, मुंबई येथून व्यापारी या भागात येत आहेत. डाळिंब खरेदी सुरू झाल्याने शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बहार धरलेल्या बागांचे योग्य व्यवस्थापनामुळे अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या उन्हाचा सामना करत शेतकर्यांनी निर्यातक्षम डाळिंब पिकविले आहे. फळांचे उन्हापासून संरक्षणासाठी बागांना क्रॉप कव्हरचे आच्छादन, वेळेत पाणी आणि खतांचे नियोजन केल्याने दर्जेदार फळे पिकवली आहेत. परिणामी, व्यापार्यांचा या भागातील फळे खरेदीवर जोर वाढला आहे.
काही ठरावीक व्यापार्यांची मक्तेदारी मोडीत काढून बाहेरील व्यापार्यांनी या परिसरात शिरकाव केल्याने शेतकर्यांना चांगला भाव मिळेल. तसेच पेमेंटही रोख मिळेल. त्यामुळे डाळिंब उत्पादक समाधान व्यक्त करीत आहेत.