

आशिष देशमुख
पुणे : शहरात दुपारी तापमानाचा पारा टिपेला जात असल्याने असह्य उकाड्याला कंटाळून नागरिक बाहेर पडणे टाळत आहेत. रस्त्यावर वाहनांची गर्दीच कमी झाल्याने दुपारी शहराच्या प्रदूषणात चक्क 50 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसत आहे. 'सफर' या संस्थेच्या नोंदीत
ही माहिती समोर आली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाडा जाणवत असल्याने दुपारी 1 ते 3 या वेळेत रस्त्यांवरची वाहतूक 70 ते 80 टक्क्यांनी कमी झाली आहे.
नागरिकांनी उन्हात पडणे जवळ-जवळ बंद केले आहे. मालवाहतूक वगळता किरकोळ कामासाठी शहरातील नागरिक दुपारी 1 ते 3 या वेळेत घराबाहेर पडणे टाळत आहेत. वैयक्तिक दुचाकी, चारचाकी गाड्यांची वर्दळ थांबल्याने शहरातील हवाप्रदूषणात 50 टक्के घट झाल्याची नोंद 'सफर' या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सरकारी संस्थेने घेतली आहे.
शहरात आरटीओच्या नोंदीनुसार, सुमारे 41 लाख वाहनांची नोंद आहे. शिवाय, पिंपरी-चिंचवडची 25 लाख वाहने व शहराबाहेरून किमान 1 ते दीड लाख वाहने ये-जा करीत असतात, त्यामुळे शहरात धूलिकणांचे प्रमाण खूप वाढले आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत वाहनांची संख्या रोडावल्याने धूलिकण प्रदूषणात मोठी घट झाली आहे. यात सूक्ष्म धूलिकण 10, अतिसूक्ष्म धूलिकण 2.5, नायट्रोजन डाय-ऑक्साईड व ओझोनचे प्रमाण निम्म्याने घटले आहे.
हवेची गुणवत्ता ही स्वयंचलित यंत्राने मोजली जात असल्याने ती दर सेकंदाची मोजली जाते. त्यामुळे दुपारी 1 ते 3 पर्यंतची हवा समाधानकारक गटात गणली जात आहे. मात्र, सायंकाळी 5 नंतर रहदारीला पुन्हा वेग येऊन ती सायंकाळी 7 वाजता अतिप्रदूषित गटात जात आहे.