

मांडवगण फराटा: मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात व ग्रामपंचायतीच्या हद्दीत केलेली अतिक्रमणे गुरुवारी (दि. 31) पोलिस बंदोबस्तात काढण्यात आली. याबाबत मांडवगण फराटा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश फराटे व समितीने अतिक्रमण काढण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. या कारवाईत 18 दुकाने जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आली.
अतिक्रमणे काढण्यापूर्वी गाळाधारकांना नोटीस देण्यात आली होती. काहींनी स्वतःहून जागा मोकळी करून दिली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जागा निश्चित करून अतिक्रमण काढावे, अशी भूमिका गाळाधारकांची होती. त्यानंतर वाद सुरू झाला.(Latest Pune News)
दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जागा निश्चित करण्यासाठी या शाळेवर यापूर्वी नियुक्ती असणारे मुख्याध्यापक यांना बोलवण्यात आले. मात्र, तरीही वाद मिटला नाही. त्यानंतर सरपंच समीक्षा फराटे पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणारे अतिक्रमण देखील हटवावे, असे प्रशासनाला सांगितले. त्यानंतर अतिक्रमणांवरील कारवाईचा मार्ग मोकळा झाला.
मांडवगण फराटा येथील माऊली मंदिरामध्ये गाळाधारकांनी बैठक घेत प्रशासन व ग्रामपंचायतीबाबत नाराजी व्यक्त केली. गाळाधारक मनोहर फराटे म्हणाले, शाळेच्या आवारामध्ये जे गाळा धारकांचे अतिक्रमणे होते.
ते काढण्याबाबत आमचा कोणताही विरोध नव्हता. परंतु, ग्रामपंचायत हद्दीतील दुकाने नोटीस न देता पाडण्यात आली. बाळासाहेब फराटे यांनीही गाळे पाडण्याबाबत आम्हाला ग्रामपंचायतीने नोटीस दिली नाही, असे सांगितले.
या वेळी त्रिंबकराव जगताप, किशोर फराटे, मनोहर फराटे, सीमा फराटे, गणपत फराटे, वंदना गवळी, बाळासाहेब फराटे, सुधीर फराटे, वैभव फराटे, रामदास नागवडे, संदीप जगदाळे, मीरा राठोड, आप्पासो देशमुख, सोमनाथ फराटे,संजय फराटे, शिवाजी फराटे, आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणार्या गाळाधारकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तीन नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. या पुढील काळामध्ये गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अजून अतिक्रमणे काढावे लागले तरी आमची तयारी आहे.
- समीक्षा फराटे पाटील, सरपंच, मांडवगण फराटा