

अशोक मोराळे :
पुणे : शहरातील कोणत्या परिसरात कशाप्रकारचे गुन्हे घडतात? त्यातील गुन्हेगार कोण आहेत? किती दिवसांनी असे गुन्हे होतात? गुन्ह्यांची वेळ व ठिकाण कोणते? गुन्ह्यांचे स्वरूप काय? अशा सर्व बाजूंनी अभ्यास करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यासाठी गेल्या दहा वर्षांत शहरात घडलेल्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, त्याचे विश्लेषण करण्यात येत आहे. पोलिस गुन्ह्यांच्या पद्धतीनुसार (क्राईम पॅटर्न) पोलिसिंगला सुरुवात करणार आहेत.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या सूचनेनुसार लवकरच शहरात क्राईम पॅटर्न पोलिसिंग सुरू केले जाणार आहे. त्यासाठी गुन्हे शाखा व शहरातील सर्व स्थानिक पोलिस ठाण्यांना मागील 10 वर्षांत आपल्या हद्दीत घडलेल्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती तपशीलवार संकलित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे काम अंतिम टप्प्यात असून, आठ दिवसांत याबाबत अंमलबजावणी होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दिली आहे.
शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडल 5 आणि 4 च्या हद्दीत सर्वाधिक गुन्हे चालू वर्षात घडले आहेत. गेल्या वर्षी परिमंडल 5, 4 आघाडीवर होते. या दोन्ही विभागांत उपनगरांचा मोठा परिसर येतो. लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे येथे दाखल होणार्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. त्या तुलनेत गेल्या काही दिवसांत मध्यवस्तीत गुन्हेगारी वाढीस लागली आहे. त्यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्याचा क्राईम पॅटर्न तयार करून त्यानुसार पोलिसिंग केले जाणार आहे.
मागील दहा वर्षांत शहरात घडलेल्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती संकलित करून तिचे विश्लेषण केले जाते आहे. त्यानंतर क्राईम पॅटर्न तयार करून पोलिसिंग केले जाणार आहे.
…असा होऊ शकतो फायदा
दहा वर्षांतील गुन्ह्यांचे विश्लेषण केल्यामुळे त्यांना कोणत्या भागात कोणत्या प्रकारचे गुन्हे घडतात, ते गुन्हे घडण्याचा कालावधी कोणता आहे, हे तपासले जाणार आहे. जबरी चोरी, बसप्रवासातील चोरी, मोबाईल स्नॅचिंग, घरफोडी अशा घटना घडणारे हॉटस्पॉट समजल्यानंतर पोलिसांची गस्त वाढविली जाईल. गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाणसुद्धा वाढेल. त्याचबरोबर संभाव्य गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल. त्यासाठी नव्याने प्रशिक्षित केले जाणारे अडीचशे शस्त्रधारी पोलिस गस्त घालणार आहेत. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ व खंडणीविरोधी या दोन्ही पथकांकडून क्राईम पॅटर्ननुसार माहिती जमा केली जात आहे. प्रामुख्याने कोणते अमली पदार्थ विक्री केले जातात, याची माहिती अद्ययावत केली जात आहे. खंडणीविरोधी पथकही अॅक्टिव्ह झाले आहे. खंडणीचे गुन्हे घडणार्या ठिकाणांचाही अभ्यास केला जात आहे.
– रितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर