

PMC scholarship for 10th and 12th pass students
पुणे: पुणे महापालिकेतर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त अरविंद माळी यांनी दिली. dbt.pmc. gov.in या संकेतस्थळावर करावा लागणार असून, ऑनलाइन अर्ज भरल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या हद्दीत राहणार्या 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या खुल्या गटातील विद्यार्थी, पुणे महापालिकेच्या शाळेतील किमान 70 टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी, 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेले आणि 55 टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी, तसेच कचरावेचक, बायोगॅस प्रकल्पावर काम करणारे किंवा कचरा व्यवस्थापनाशी संबंधित असंघटित कामगारांच्या मुलांनी किमान 65 टक्के गुण मिळवले असल्यास या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. (Latest Pune News)
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘मौलाना अबुल कलाम आझाद‘ शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 15 हजार रुपये, तर बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे‘ योजनेअंतर्गत 25 हजार रुपये अर्थसाह्य पुढील शिक्षणासाठी दिले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
अर्जदारांनी अर्ज भरून तो ड्राफ्ट स्वरूपात न ठेवता सबमिट करणे बंधनकारक आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. फक्त शासनमान्य संस्थांमध्ये दहावी किंवा बारावीनंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. अधिक माहितीसाठी विद्यार्थी 18001030222 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.