पुणे : सायबर चोरट्यांना पोलिस पडले भारी; प्रसंगावधान दाखवत 13 लाख वाचवले

पुणे : सायबर चोरट्यांना पोलिस पडले भारी; प्रसंगावधान दाखवत 13 लाख वाचवले

पुणे : पुण्यातील एका सेवानिवृत्त प्राध्यापिकेच्या बँक खात्याची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने अवघ्या काही तासांत 20 लाख रुपयांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली. मात्र, तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी थेट बँकेशी संपर्क साधून चोरट्याने ज्या खात्यात पैसे वर्ग केले होते तेथेच ते थांबवले. तर बँकेला देखील एकाच खात्यावर एवढे ट्रान्जेक्शन होत असल्याचा संशय आल्याने त्यांनी तीन लाख रुपये थांबवले.

एकूण 13 लाख रुपये पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या तावडीतून परत मिळवले. त्यामुळे ऐरवी सुसाट असणार्‍या सायबर चोरट्यांना मात्र पुणे पोलिस भारी पडले. पुण्यातील कोथरुड परिसरात वास्तव्यास असलेल्या एका 74 वर्षीय सेवानिवृत्त प्राध्यपिकेला पेन्शनचे पैसे मिळाले होते. सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाईलवर मेसेज करून केवायसी अपडेट करून घ्या अन्यथा तुमचे बँक खाते बंद होईल, असे सांगितले. तेथे सायबर चोरट्याने एक संपर्क क्रमांकदेखील दिला होता.

प्राध्यापिकेला खरोखरच बँक खाते बंद होते आहे की काय असे वाटल्यामुळे त्यांनी सायबर चोरट्याच्या नंबरवर संपर्क केला, आणि तेथेच त्या फसल्या. चोरट्याने त्यांचा विश्वास संपादन करून बँकेतील अधिकारी बोलत असल्याचे भासवून, त्यांच्या बँक व एटीएम कार्डची सर्व गोपनिय माहिती आपल्याकडे घेतली. पुढे त्याच माहितीचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात केली.

रात्री साडेनऊ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत पन्नस-पन्नास हजार रुपयांचे चाळीस ट्रान्जेक्शन करून तब्बल 20 लाख रुपये आपल्या खात्यात वर्ग करून घेतले. हा प्रकार घडल्यानंतर प्राध्यापिका दुसर्‍या दिवशी सकाळी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी तत्काळ तक्रार घेऊन ज्या बँकेत पैसे गेले होते, त्यांच्याशी संपर्क करून दहा लाख रुपये थांबविले. तर बँकेने देखील तीन लाख रुपये थांबविले होते.

असे एकूण तेरा लाख रुपये पोलिसांनी थांबवले, तर राहिलेले सात लाख रुपये वॉलेटला गेले होते. ते देखील पोलिसांनी 'फि—ज' करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सायबर चोरट्यांनी उत्तरप्रदेशातील गाजियाबाद येथील बँकेत हे पैसे गेले होते. पोलिसांनी बँकेत धाव घेत माहिती घेऊन प्राध्यापिकेच्या बँक खात्यातून कोणत्या बँकेत पैसे गेलेत याचा शोध घेतला. त्यानंतर त्या बँकेला संपर्क करून हे पैसे गोठविण्यात आले. याबाबत प्राध्यापिकेने दिलेल्या तक्रारीनुसार अलंकार पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिसि निरीक्षक राजेंद्र सहाणे करीत आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news