इंटर नेट सायबर गुन्हे रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Internet
Internet
Published on
Updated on

पिंपरी : संतोष शिंदे : इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे फसवणुकीचे प्रकारही झपाट्याने वाढू लागले आहेत. या संदर्भात राज्यभरात दररोज हजारो गुन्हे दखल होत आहेत.

एकट्या पिंपरी-चिंचवड शहरात गतवर्षी सन 2021 मध्ये दोन हजार 393 जणांची फसवणूक झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. त्यामुळे परदेशातून चालवण्यात आलेले हे सायबर गुन्ह्यांचे रॅकेट पोलिसांसमोरचे मोठे आव्हान ठरत आहे.

यावर उपाय काढण्यासाठी यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, तोपर्यंत नागरिकांनी स्वतः खबरदारी घेण्याची गरज आहे. आज मंगळवार (दि. 8) इंटरनेट सुरक्षितता दिवस म्हणून जगभरात साजरा होत आहे.

या निमित्ताने 'पुढारी'ने सायबर तज्ज्ञांशी बोलून नागरिकांनी सायबर चोरटे कशी फसवणूक करतात आणि त्यासाठी नेमकी काय खबरदारी घ्यावी, यावर केलेला हा वृत्तांत.

ओएलएक्सवरील अनोळखी व्यक्तीने मला 'गुगल पे'वर एक रुपया पाठवण्यास सांगितला. त्यानुसार, मी त्याला तीनदा एक रुपया पाठवला.

त्यानंतर काही वेळातच माझ्या खात्यावरील 74 हजार 997 रुपये कमी झाल्याचे मला समजले. याबाबत मी पिंपरी- चिंचवड सायबर सेल येथे तक्रार नोंदवली असल्याचे चिंचवड येथील सुनीता यांनी सांगितले.गिफ्ट लागले असल्याच्या बहाण्याने एका अनोळखी व्यक्तीने माझ्याशी संपर्क केला.

त्यानंतर दहा लाख रुपयांचे गिफ्ट मिळवण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून माझ्याकडून दोन लाख 85 हजार रुपये हस्तांतरित करून घेतले.पैसे मिळाल्यानंतर मोबाईल बंद केल्याचे रावेत येथील निशा यांनी सांगितले.

मोबाईल हाताळणे म्हणजे, सायबर साक्षरता नाही

दैनंदिन जीवनात आर्थिक, बँकिंग, व्यावसायिक, शैक्षणिक, वैद्यकीय व जनसंपर्क आदी संदर्भातील सर्व महत्वाचे व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातूनच पार पाडले जातात. मात्र, अपुर्‍या माहितीमुळे ते धोकादायक बनले आहे. यामुळे सायबर साक्षरता ही एक महत्वाची बाब आहे. उत्तम प्रकारे मोबाईलचा वापर करणे, म्हणजे आपण सायबर साक्षर आहोत, असे होत नाही.

सायबर गुन्हे म्हणजे नेमके काय?

ज्या गुन्ह्यांमध्ये संगणक इंटरनेट किंवा मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करून वैयक्तिक किंवा संस्था विरोधात कृत्य केले जाते, अशा गुन्ह्यांना सायबर गुन्हे असे म्हणतात. हे गुन्हे करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइट्स, ई-मेल, चॅट रूम, पायरेटेड सॉफ्टवेअर, वेबसाईट अशा प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो.

सायबर चोरट्यांच्या महत्त्वाच्या मोडस ऑपरेंडी

सायबर चोरटे नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठी काही ठराविक मोडस ऑपरेंडी यांचा जास्त वापर करतात. यामध्ये सोशल इंजिनिअरिंग, फिशिंग, नोकरीचे, लग्नाचे, लॉटरीचे आमिष, आयडेंटी थेफ्ट आणि बँकिंग संदर्भात, असे सायबर गुन्ह्यांच्या प्रमुख मोडस ऑपरेंडी आहेत.

सोशल इंजिनिअरिंग

या मोडस ऑपरेंडीमध्ये सायबर चोरटे नागरिकांना आपली गोपनीय माहिती उघड करण्यासाठी भाग पाडतात. त्यासाठी खोटी कारणे देऊन पटवून सांगण्याची कला सायबर चोरट्यांकडे असते.

हे गुन्हे करण्यासाठी त्यासाठी फोन कॉल, ई-मेल किंवा, व्यक्तिशः भेटून माहिती घेतली जाते. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी इसमांना आपली कोणतेही गोपनीय माहिती देऊ नये.

फिशिंग

फिशिंगमध्ये सायबर चोरटे सोशल मीडिया, बँकिंग व एटीएम कार्डची गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. तसेच, मूळ संकेतस्थळासारखे दिसणारे बनावट संकेतस्थळ बनवून ग्राहकांची संवेदनशील/गोपनीय माहिती परस्पर काढून घेतली जाते. साधारण ई-मेल, फोन, मेसेज करून किंवा बनावट वेब लिंक पाठवून देख ही माहिती चोरण्यात येते.

नोकरीचे प्रलोभन

या मोडस ऑपरेंडीद्वारे बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढले जाते. सायबर चोरटे तरुणांना खोटी आश्वासने देतात. नामांकित कंपनीत तत्काळ नोकरी लावण्याचे आमिष दाखवतात.

त्यासाठी निवड झाल्याची खोटी यादीदेखील तरुणांना पाठवली जाते. त्यामुळे तरुणांनी आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी अज्ञातांकडून मिळालेली नोकरीची ऑफर पडताळून पाहावी.

लॉटरीचे आमिष

अचानक लॉटरीची ऑफर आल्यास सावधगिरी बाळगावी. चोरटे लॉटरीची रक्कम मिळवण्यासाठी आगाऊ पैसे भरण्यास सांगतात, याला बळी पडू नये. खात्रीसाठी म्हणून चोरटे ई-मेलवर संलग्न फाईल किंवा लिंक पाठवतात. ही लिंक व फाईल अजिबात उघडू नये. चोरटे या लिंक किंवा फाईलद्वारेदेखील आपली गोपनीय माहिती चोरून त्याद्वारे फसवणूक करू शकतात.

लग्नाच्या भूलथापा

यामध्ये सायबर चोरटे विवाह जुळवणार्‍या संकेतस्थळावर खोट्या व आकर्षक प्रोफाईल तयार करतात. तरुण-तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी जवळीक साधली जाते.

त्यानंतर चोरटे पैशाची मागणी किंवा एखादा गैरकृत्य करण्यास भाग पाडतात. त्यामुळे विवाह जुळवणार्‍या साईटवर मैत्री करताना सावधानता बाळगण्याची गरज आहे.

तसेच, ओळख वाढवताना अनोळखी व्यक्तीची प्रोफाईल तपासावे. आपली संवेदनशील, गोपनीय माहिती त्यांना सांगू नये. स्वतःचे वैयक्तिक फोटो शेअर करू नयेत. त्यांच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

बँकविषयक फसवणूक

नागरिकांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून सायबर चोरटे परस्पर पैसे काढून घेतात. त्यामुळे आपल्या डेबिट कार्डची माहिती, सोळा अंकी नंबर, पिन, ओटीपी क्रमांक कोणालाही देऊ नका.

अशा गोपनीय माहितीसाठी बँक कधीही फोन करत नाही. आपला पिन क्रमांक एटीएम किंवा इतर ठिकाणी टाकताना सावधानता बाळगा. एटीएमच्या वापरानंतर मशीनमधून येणार्‍या पावत्या नष्ट करा.

मोबाईलवर संशयित मेसेज येत असतील तर, त्वरित तुमच्या बँकेशी संपर्क साधा.

चाइल्ड पॉर्नोग्राफी

अठरा वर्षांखालील बालकांवर होणारा लैंगिक अत्याचार व त्याचे चित्रीकरण याला चाईल्ड पॉर्नोग्राफी म्हणतात. लहान बालकांना खाऊ, खेळणी आदींचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केले जातात.

सायबर ग्रूमिंग

सोशल मीडिया किंवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर मुलांचे लैंगिक किंवा कोणत्याही प्रकारचे शोषण करण्याच्या उद्देशाने जवळीक निर्माण केले जाते. सायबर ग्रूमर आपल्याला भेटवस्तू, प्रशंसा, मॉडलिंग जॉबची ऑफर देतात. त्यानंतर ते अश्लील संदेश छायाचित्रे किंवा व्हिडिओ पाठवू लागतात.

सायबर बुलिंग

यामध्ये महिला व मुलांना धमकी देऊन त्यांना मानसिक त्रास दिला जातो. अश्लील किंवा हानिकारक संदेश टिप्पण्या, प्रतिमा आणि व्हिडिओ पाठवून त्रास देण्यासाठी इंटरनेट किंवा मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

सायबर गुन्हे करणारे व्यक्ती, मजकूर, संदेश, ई-मेल, सोशल मीडिया, प्लॅटफॉर्म वेबपृष्ठ चॅट रुम्स आदींचा वापर करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, भावनिक, सामाजिक आणि मानसिक जीवनात गंभीर परिणाम होतात.

मॉर्फिंग

मॉर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ चित्र बदलले जाते. महिलांचे मूळ चित्र वेबसाईटवरून डाऊनलोड करून मोर्फ करून पुन्हा ते वेबसाईटवर रिपोस्ट किंवा अपलोड केले जाते.

हवा सशक्त पासवर्ड…

आपल्या खात्यांना असलेला सशक्त पासवर्ड हा देखील आपली होणारी फसवणूक टाळू शकतो. पासवर्ड नियमित बदलत राहावा. पासवर्ड कोणालाही सांगू नये, प्रत्येक खात्यासाठी वेगवेगळा पासवर्ड असावा.

आयडेंटी थेफ्ट

सायबर चोरटे आयडेंटी थेफ्टच्या माध्यमातून आपल्या जवळच्या व्यक्तींची फसवणूक करू शकतात. त्यामुळे सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर जन्मतारीख, जन्मस्थान, पूर्वीचे नाव, कौटुंबिक तपशील, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, पॅन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स याबाबत माहिती देऊ नये.

या माहितीच्या आधारे सायबर चोरटे इतरांना आपण आहोत, असे भासवून त्यांची फसवणूक करू शकतात. आपली कागदपत्रे जमा करताना त्यावर नेहमी कारण, तारीख, स्वाक्षरी करावी. याव्यतिरिक्त लकी ड्रॉ कुपन किंवा कोणताही फॉर्म भरताना काळजी अधिक काळजी घ्यावी.

फुकटचा वायफाय पडेल महागात

सार्वजनिक ठिकाणी असलेले फ्री वायफाय वापरतानादेखील सायबर चोरटे आपला मोबाईल हॅक करू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वाय-फायचा वापर टाळावा. सार्वजनिक वायफाय वापरताना व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (तझछ) वापरावे. सुरक्षित ब्राउझिंगसाठी कढढझड वेबसाईट वापरा. मोबाईलवरील ऑटोमॅटिक वाय-फाय लॉगिन बंद ठेवा. वाय-फाय साइन अप करण्यासाठी संवेदनशील माहिती भरताना खबरदारी घ्यावी.

दैनंदिन जीवनात दररोज इंटरनेटशी येणारा संबंध

  • इंटरनेट बँकिंग ऑनलाईन खरेदी
  • ऑनलाईन गेम्स मनोरंजन
  • शिक्षण ऑनलाईन संवाद
  • इतर सोशल माध्यम

सायबर चोरटे नागरिकांना फसवण्यासाठी दररोज नवनवीन क्लृप्त्या लढवत आहेत. त्यामुळे इंटरनेटचा वापर करताना अधिक सजग राहण्याची गरज आहे. अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या कुठल्याही आमिषाला नागरिक बळी न पडल्यास सायबर चोरट्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत.
– डॉ. संजय तुंगार,वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल

https://youtu.be/gUWZqZyNLD0

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news