पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुख्यात शरद मोहोळचा खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार असणार्या विठ्ठल शेलार याची पुनावळे भागात तर रामदास मारणे याची मुळशी परिसरात पुणे पोलिसांनी धिंड काढली. तालुक्यातील गुंडांना जरब बसण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून ही धिंड काढण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांनी दिली. शेलार व मारणे यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना शनिवारी (दि. 20) न्यायालयात हजर करण्यात आले.
या वेळी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी मोहोळचा खून झाल्यानंतर पळून जाण्यासाठी शेलार याने वापरलेली बुलेटप्रुफ स्कॉर्पिओ पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एक साक्षीदार शोधला असून गुन्हा घडण्यापूर्वी तो गणेश मारणे याच्या संपर्कात तर गुन्हा घडल्यानंतर तो शेलार याच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत, शेलार व रामदास मारणे यांचेकडे तपास करायचा आहे. तसेच, शेलार याने गणेश मारणेसोबत ज्याठिकाणी मोहोळला मारण्याचा कट रचला ते स्थळ पोलिसांना दाखविले आहे.
रामदास मारणे व शेलार यांचेकडे गुन्ह्याचा अधिक तपास करायचा असल्याने त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील निलीमा इथापे-यादव यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी ती मान्य करत आरोपींच्या पोलिस कोठडीत 24 तारखेपर्यंत वाढ केली.
हेही वाचा