मनोरंजन : रुपेरी पडद्यावरचे रामायण | पुढारी

मनोरंजन : रुपेरी पडद्यावरचे रामायण

सुलभा तेरणीकर

भारतीयांना रामकथा ठाऊक असली तरी त्या कथेची विविध वळणं, रूपं नित्य आकर्षित करतात. पुराणकथा मंदिरातला कथा वाचक सांगत असतो, तेही उत्सुकतेनं आपण ऐकतो. अठराव्या शतकातल्या बारामतीच्या मोरोपंतांनी 108 रामायणं लिहिली तीही उत्सुकतेनं, कुतूहलानं पाहतो. महर्षी वाल्मीकी, संत तुलसीदास यांची रामायणं वंदनीय, पूजनीय मानतो. मैदानावर चालणारी रामलीला कौतुकानं पाहतो. चित्रपट, भावगीत, रंगमंचावरील नाटक यातून रामकथा नित्य वाहते. तीही बघतो. ऐकतो. तरीही त्याचे आकर्षण तसेच राहते. रामकथा खुणावते. कृष्णप्रेमानं कला, साहित्य, संगीत भरून राहिलं असलं, तरी रामकथा नित्य आकर्षित करते.

आपल्या पुराणकथांसाठी दादासाहेब फाळके यांनी पडद्यावरील कथेचे सिनेमाचे अद्भुत विश्व आपल्याला खुले केले. 3 मे 1913 या दिवशी ‘राजा हरिश्चंद्र’ हा मूकपट पडद्यावर आणला. तो हरिदासांकडून ऐकलेल्या कथा किंवा दशावतार इत्यादी खेळ पाहिलेल्या भारतीयांना पडद्यावर चालत्या बोलत्या हलक्या प्रतिमा दिसल्या. 1917 साली दादासाहेबांनी ‘लंकादहन’ हा मूकपट पण ट्रिकसीन वापरून जिवंत केला आणि इतिहास घडला. शेपटी वाढत चाललीय आणि हनुमान पर्वतप्राय उंचीचे झाले आहेत आणि हाहाकार उडाला आहे ,हे ‘याची देही याचि डोळा’ लोकांनी पाहिले. प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि पडद्यावरील अद्भुत विश्व खुलं झालं. वीसच्या दशकातील मूकपट पाहिले तर ‘लंकादहन’ पाठोपाठ ‘सीता स्वयंवर’, ‘अहिरावण महिरावण’, ‘अहिल्योद्धार’, ‘सती अंजनी’, ‘सीता वनवास’, ‘शतमुख रावणवध’, ‘कोदंडधारी राम’, ‘लंका’ इत्यादी चित्रपट सरकून जाताना दिसतील.

चित्रपट बोलू लागला तसे 1931 पासून रामकथा पडद्यावर झळकत राहिली. 1932 सालचा मराठीतला पहिला बोलपट ‘अयोध्येचा राजा’ ‘प्रभात’ने निर्माण केला. व्ही. शांताराम दिग्दर्शित चित्रपटात गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे यांच्या भूमिका होत्या. ‘रामायण’, ‘रामबाण’, ‘रामदर्शन’, ‘रामप्रतिज्ञा’, ‘रामविवाह’, ‘रामधुन’, ‘राम हनुमान युद्ध’, ‘रामलक्ष्मण’, ‘रामनवमी’ असे किती तरी चित्रपट सांगता येतील.

पण यात आजही आठवला जातो तो 1943 सालचा चित्रपट ‘रामराज्य’. महात्मा गांधींनी पाहिलेला एकमेव चित्रपट म्हणून प्रसिद्ध पावलेला ‘रामराज्य’ हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक सुप्त संदेश देणारा म्हटला पाहिजे. आदर्श, लोकानुरंजन करणारा राजा राम ही प्रतिमा पडद्यावर चितारली गेली. मराठी भाषेत राम झाले होते चंद्रकांत, तर हिंदीत प्रेम अदीब नावाचे नट. सीता म्हणून सुंदर शोभना समर्थ शोभल्या. कथा-पटकथा-संवाद विष्णुपंत औंधकर यांचे होते. आजही ते नवीन पिढीने ऐकावे असेच आहेत. हिंदी आवृत्तीमध्ये सरस्वतीबाई राणे यांचे ‘बीना मधुर मधुर कछुबोल’ या गाण्याने रसिकांची आठवण जागी होईल. पण ‘स्वयंवर झाले सीतेचे’ या 1960 सालच्या मराठी चित्रपटात ‘रामराज्य’चे राम झालेले चंद्रकांत साक्षात रावण होऊन गाताना दिसतात.

‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ हे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं गीत अजरामर झालं आहे. 1961 सालचा होमी वाडियांचा संपूर्ण रामायण रंगीत असल्याने सुखद वाटला. पण वात्सल्यमूर्ती सुलोचनादीदी इथे कैकयी झालेल्या आहेत. अर्थात रामायणाचे महत्त्व आणि गोडी कधी उणावली जात नाहीच.

विख्यात नर्तक सचिन शंकर आणि कुकुम लेले ‘कथा ही राम जानकी’ची हे सुंदर नृत्यनाट्य सादर करीत असत, तेही काहींना आठवत असेल. रंगभूमीवर ‘रामराज्य वियोग’ किंवा ‘धाडिला राम तिने का वनी’ अशा रामकथा अवतरल्या. पण रेडिओ आणि दूरदर्शन या माध्यमानं दोन अद्भुत रामकथा सादर केल्या त्याबद्दल सांगायला हवे.

1955 च्या वर्षप्रतिपदेला रेडिओवर सुरू झालेलं गीतरामायण हे शब्द सूर यातून उभं राहिलेलं रामायण या शतकातील अद्भुत घटना म्हटली पाहिजे. आधुनिक वाल्मीकी कवी ग. दि. माडगूळकर आणि गायक संगीतकार सुधीर फडके यांनी एक इतिहास रचला. रेडिओसाठी माणिक वर्मा, मालती पांडे, गजाननराव वाटवे ते लता मंगेशकर यांनी एकेक व्यक्तिरेखा गाण्यातून सादर केली. घरोघर गीतरामायणाचे दुसरे गाणे कोणते, अशी प्रतीक्षा होई. दशरथा घे हे पायसदान तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा, सेतु बांधा रे सागरी, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, माता न तू वैरिणी, दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे… अशी गाणी केवळ श्रवणभक्तीने श्रोत्यांनी ऐकली आणि रामकथेतील त्याग, प्रेम, बंधुभाव, लोकानुरंजन करणारा राजा, वनवासी सीता, लवकुश… अशा अनेक मूल्य, घटना जीवित झाल्या. जटायू, हनुमंत, कैकयी, कौसल्या, राजा दशरथ… हे केवळ शब्दसुरांतून उभे राहिले. हे अलौकिक गीतरामायण त्यातील मानवी मूल्ये, शब्दसंपदा, विविध राग, ताल, भाव यांनी नटलेलं आहे. आजही त्याची गोडी उणावली नाही. उलट नवीन गायकांची पिढीही ते गात आहे.

दुसरी दूरदर्शनने दिलेली भेट म्हणजे 25 जानेवारी 1987 या दिवशी रामानंद सागर यांची मालिका. रामायण पाहण्यासाठी घरातच श्रोते प्रेक्षक बसलेले आहेत. गर्दी नसल्याने रस्ते शुकशुकाट होऊन ओस पडलेले आहेत आणि सर्व भारतीय आपली जात, धर्म, पंथ विसरून रामायणात हरवून गेलेले आहेत. हा एक इतिहासच घडला. डॉ. राही मासूम रझा यांचे संवाद, दृश्य, पात्रं, घटना यांची मालिका सुरू आहे आणि पुन्हा एकदा रामकथा त्यातील नाट्य, मूल्यं यांसह ऐकवली जाते. अवघ्या भारतीयांना बांधून ठेवणार्‍या रामायण या अद्भुत रचनेसाठी अनेक कथाकार, कवी, गायक यांनी पुढे येऊन एकेक ज्योत लावलेली आहे.

‘ऐकलात का हट्ट नवा, रामाला गं चंद्र हवा’ हे बहुधा प्रभू रामचंद्र यांच्या बालपणाचं एकमेव गीत असावं. पुढे अनेक प्रसंगांवर भावगीते आढळतील. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी, राम घ्यावा राम घ्यावा राम जीवीचा विसावा, उठि श्रीरामा, रामचंद्र मन मोहन अशी कितीतरी भावगीतं मराठी मनावर राज्य करतात. समर्थ रामदासांची करुणाकष्टके, संत तुलसीदासांचे रामचरित मानस किंवा उर्दूमधील चकबस्त लखनवी यांचे रामायण अशा रचना कधीही विस्मृतीत जाणार नाहीत, हे त्रिवार सत्य.

Back to top button