पुणे : व्यावसायिकाचे अपहरण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या गुंड गज्या मारणे व त्याच्या तीन साथीदारांना कारागृहातून ताब्यात घेत न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला 29 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गज्या पंढरीनाथ मारणे (वय 57, रा. शास्त्रीनगर, कोथरूड), मयूर राजेंद्र निवंगुणे (वय 24, रा. नर्हे), प्रसाद बापू खंडाळे (वय 29, रा. पद्मावती), मयूर जगदीश जगदाळे (वय 31, रा. आंबेगाव पठार) अशी कोठडी झालेल्यांची नावे आहेत.
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवलेल्या 4 कोटींच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी करून व्यावसायिकाचे अपहरण करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मारणे व त्याच्या साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. मारणे व इतर तीन आरोपी कोणत्या उद्देशाने व कोणाच्या सांगण्यावरून गुन्ह्यात सहभागी झाले याचा तपास करायचा असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.