बिल्डरपुत्राच्या चौकशीची पोलिसांना परवानगी; बाल न्याय मंडळाची मान्यता

बिल्डरपुत्राच्या चौकशीची पोलिसांना परवानगी; बाल न्याय मंडळाची मान्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या चौकशीची परवानगी बाल न्याय मंडळाकडून पोलिसांना मिळाली आहे. शनिवारी (दि. 1 जून) पोलिस त्याची पालकांसमोर दोन तास चौकशी करणार आहेत. अपघात झाला त्या वेळी गाडीत कोण होते? गाडी कोण चालवत होते? अपघाताच्या वेळी नेमके काय झाले? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना मिळण्याचा अंदाज आहे. सध्या अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहात असून, त्याचा मुक्काम 5 जूनपर्यंत आहे. चौकशीच्या वेळी चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर तसेच मुलाचे पालक उपस्थित असणार आहेत. पालकांना उपस्थित राहण्याबाबत पोलिसांकडून नोटीस बजाविण्यात आल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत तीन वेगळेगळे गुन्हे दाखल केले आहेत. मुलाचे वडील आणि आजोबा या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, मुलाच्या वैद्यकीय चाचणीवेळी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदल्याप्रकरणी ससूनच्या दोघा डॉक्टरांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या सर्वांची पोलिसांनी चौकशी केली. मात्र, ज्या मुलामुळे हा अपघात घडला, त्याची थेट चौकशी पोलिसांनी अद्याप केलेली नाही. त्यामुळे आता मुलाच्या चौकशीदरम्यान पोलिसांच्या तपासाची दिशा निश्चित होऊ शकेल.

पोलिस ठाण्यात नेमके काय घडले..?

अपघातानंतर पोलिस मुलाला येरवडा पोलिस ठाण्यात घेऊन गेले. गुन्ह्यातून मुलाला वाचविण्यासाठी बिल्डर बापाने तेथूनच मोठी फिल्डिंग लावल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांना लोकप्रतिनिधींनी फोन केले होते का? तसेच गुन्हा दाखल करतेवेळी चालकावर दबाव टाकण्यात आला का? चालकाला पोलिसांनी कोणत्या खोलीत बसविले? तेथे त्याच्याबरोबर कोण-कोण होते? मुलगा पोर्शे गाडी कधीपासून चालवत होता? याची माहिती मिळणार आहे.

रक्तनमुने बदलाचे चित्र होऊ शकते स्पष्ट

मुलाला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात घेऊन आल्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष परीक्षणासाठी देताना दुसर्‍याचे रक्त देण्यात आले. ससूनच्या दोघा डॉक्टारांनी हे कृत्य केले. दरम्यान, मुलाला हे रक्त नमुने कोणी आणि कसे बदलले? याबाबत माहिती आहे. त्यामुळे पोलिसांना त्याच्या चौकशीत ही माहिती मिळू शकते. तर वैद्यकीय चाचणीच्या वेळी त्याच्यासोबत घरातील व बाहेरील कोण-कोण होते, हे देखील समजू शकते.

या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता

मुलगा पार्टीला जाताना घरातून किती वाजता बाहेर पडला? त्या वेळी गाडी कोण चालवत होते? पार्टीसाठी मुलगा कोणकोणत्या पबमध्ये गेला? तेथे त्याने कोणासोबत मद्य प्राशन केले ? पबमधून बाहेर पडल्यानंतर गाडी कोण चालवत होते? त्याचबरोबर गाडीत मुलाचे कोण-कोण मित्र आणि किती जण होते? अपघात नेमका कसा झाला? गाडी किती वेगाने धावत होती? अपघातस्थळावर नेमके काय घडले? पोलिस किती वेळाने तेथे आले? पोलिस ठाण्यात मुलाला किती वाजता घेऊन जाण्यात आले? तसेच मुलाला पोलिसांनी बर्गर आणि पिझ्झा दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीत हे देखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news