केज, पुढारी वृत्तसेवा : रास्त धान्य दुकानामध्ये झालेल्या धान्याच्या तफावतीबद्दल कारवाई न करण्यासाठी वीस हजार रुपयाची लाच घेणाऱ्या कोतवालासह तहसीलदारा विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार अभिजीत जगताप आणि कोतवाल मच्छिंद्र माने अशी अधिकारांची नावे आहेत. धाराशिव येथील लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने कोतवालास लाच घेताना रंगेहात पकडले, तर सध्या तहसीलदार फरार आहे.
केज तालुक्याचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील स्वस्त धान्य दुकानांना भेटी दिल्या होत्या. या भेटीमध्ये रास्त धान्य दुकानाच्या दुकानदारांना मिळालेले स्वस्त धान्याचा कोटा आणि वाटप यामधील तफावत आणि अनियमितता निदर्शनास आली होती. यामधील रास्त धान्य दुकानावर कारवाई न करण्यासाठी तसेच त्या दुकानाचा दुकानाचा परवाना रद्द न करण्याकरीता तहसिलदार अभिजीत जगताप यांनी पुरवठा विभागातील चतुर्थश्रेणी कोतवाल मच्छिंद्र माने यांच्यामार्फत तक्रारदारकडे 40 हजार रु. लाचेची मागणी केली होती.
मच्छिंद्र माने यांनी शुक्रवारी (दि.31) तडजोडी अंती 20 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य करुन समक्ष तक्रारदार यांचेकडुन केज उपजिल्हा रुग्णालयाच्या जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये 20 हजाराची लाच स्विकारताना धाराशिव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कोतवाल मच्छिंद्र माने यांना ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपी तहसीलदार अभिजीत जगताप फरार आहेत.
या कारवाईत धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे, संभाजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्यासह पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, नागेश शेरकर, वाहन चालक दत्तात्रय करडे यांनी कारवाईत भाग घेतला. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
हेही वाचा :