

वडगाव शेरी: शहरातील अनेक बस मार्गावर बसथांबा नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. प्रवाशांनी मागणी करूनही बसथांबा उभारले जात नाही.
मात्र, कल्याणीनगरमध्ये जिथे बसमार्ग नाही, अशा बिशप शाळेसमोर अरुंद रस्त्यावर बसथांबे उभारण्याचा सावळा कारभार पीएमपीने केला आहे. व्यावसायिकांच्या हितासाठी पीएमपीने गरज नसताना बसथांबे बांधले. या बसथांब्यामुळे वर्दळीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे.
कल्याणीनगर बिशप शाळेसमोरील रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावर वडगाव शेरी, विमाननगर, कोरेगाव पार्कमधून येणाऱ्या वाहनांची दररोज सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या वर्दळीमुळे चौकात वाहतूक कोंडी होते. कल्याणीनगरमध्ये पीएमपीची कोणतीही बससेवा सुरू नाही.
तरी, कल्याणीनगर बिशप शाळेसमोर एका रात्रीत बसथांबा उभा केला आहे. या बसथांब्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडणार आहे. तसेच बसथांब्यामुळे अपघात होऊ शकतो. पीएमपी प्रशासनाने तत्काळ हा बसथांबा हटवण्याची मागणी होत आहे.
यामुळे उभारला रात्रीत बसथांबा
कल्याणीनगरमध्ये बसथांब्यावरील जाहिरातींना खूप मागणी आहे. बसथांब्यावरील जाहिरातीसाठी एका महिन्याला जवळपास ३० ते ५० हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न जाहिरातदारांना मिळते. यामुळे जाहिरातदारांच्या फायद्यासाठी बस मार्ग नाही, तिथे बसथांबा उभारण्याचा घाट पीएमपी प्रशासनाने घातला असल्याची चर्चा आहे. या बसथांब्यामुळे वाहतूक कोंडी आणि पादचार्यांची गैरसोय होत आहे. यामुळे गरज नसलेला बसथांबा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.