बालाजी गुत्ते… शिवकाळ जागविणारा अवलिया पीएमपी चालक

पर्यटकही मिसळतात गित्ते यांच्या सुरात सूर; पोवाड्याला देतात दाद
पर्यटकही मिसळतात गित्ते यांच्या सुरात सूर; पोवाड्याला देतात दाद
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे : गड आला पण सिंह गेला… प्रतापगडचे युद्ध… स्वराज्याचे बांधलेले तोरण, यांसारख्या शिवकाळातील आठवणींना पीएमपीचा एक अवलिया चालक सध्या उजाळा देत आहे. तो कसा? असा प्रश्न नक्कीच पडला असेल. तर हा चालक आपल्या मर्दानी स्वरातून विविध पोवाडे गाऊन शिवकाळातील आठवणी जागवत आहे. त्याला पर्यटक प्रवासीही उत्तम साथ देऊन चालकाच्या सुरात सूर मिसळत आहेत.

सिंहगड ई-बसवर सेवा पुरविणारे पीएमपी चालक बालाजी गुत्ते, आपल्या मर्दानी स्वरांनी सिंहगड किल्ल्याचा पायथा ते किल्ल्यावरील पार्किंग दरम्यानच्या प्रवासावेळी विविध प्रकारचे पोवाडे सादर करून शिवकाळातील आठवणींना उजाळा देत आहेत. गुत्ते प्रवासादरम्यान विविध प्रकारचे पोवाडे सादर करत असताना पर्यटकांच्या अंगावर शहारे येतात. पर्यटकदेखील मग गुत्ते यांच्या सुरात सूर मिसळतात. त्यामुळे पर्यटकांचा सिंहगड पायथा ते थेट किल्ल्यावर जाण्याचा प्रवास अतिशय आनंददायी होत आहे.

पीएमपीने नुकतीच सिंहगडावर ई-बस सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे किल्ल्यावर खासगी वाहनांना बंदी करण्यात आली असून, पर्यटकांना ई-बसनेच आता किल्ल्यावर जावे लागत आहे. या प्रवासाकरिता पीएमपीने आपल्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या 9 मीटर लांबीच्या 6 ई-बस येथे उपलब्ध करून दिल्या आहेत.

व्हिडिओ सर्वत्र व्हायरल

सिंहगड प्रवासादरम्यान बालाजी गुत्ते हे गाडी चालविताना आपल्या मधुर स्वरांनी विविध पोवाडे सादर करत आहेत. त्यांचे व्हिडिओ काढून पर्यटक फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. गुत्ते यांचे व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, अनेकांच्या स्टोरी, स्टेटसलादेखील पाहायला मिळत आहेत.

पीएमपीचे चालक गुत्ते यांचा व्हिडीओ आम्ही पाहिला. खूप चांगला आहे. यातून कामगार हे फक्त नियमित कामच करत नसून, आपल्या इतिहासाचे महत्त्वदेखील पर्यटकांना पटवून देत आहेत. चालकाचे आम्हाला खूपच कौतुक आहे.

– डॉ. चेतना केरूरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news