

Pune Dangerous Buildings
पुणे: पुण्यातील लष्कर भागात मंगळवारी (दि.1) एका धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला. या घटनेमुळे शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील 37 इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या इमारती पाडण्यास नागरिक विरोध करत असून, पावसाळ्यात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या इमारतींचे वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हे वाडे व इमारती रिकामे करण्यास मदतीसाठी पोलिसांना पत्र देखील दिले आहे.
पुण्यात 2800 जुने वाडे आहेत. यातील अनेक वाडे व इमारतींचा पुनर्विकास करण्यात आला आहे. मात्र, काही वाडे मालक- भाडेकरू वाद, बांधकाम नियमावलीमुळे येणारे अडथळे, आर्थिक अडचणी यामुळे अद्यापही तसेच असून येथे अनेक कुटुंब राहतात. (Latest Pune News)
लाकूड आणि मातीचा वापर करून पूर्वी बांधलेले हे वाडे व इमारती जीर्ण झाल्या आहेत. यापूर्वी हे वाडे कोसळून दुर्घटना घडून जीवितहानी झाली आहे. त्यामुळे महापालिकेने धोकादायक इमारती व वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते पाडण्यासाठी वाडे मालकांना नोटिसा दिल्या होत्या.
या वर्षी 116 धोकादायक वाड्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. यातील 76 वाडे आतापर्यंत उतरविण्यात आले आहेत. तर 37 वाडे धारकांकडून वाडे उतरविण्यास तीव्र विरोध होत आहे. काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था नाही, तर मालकी हक्क व अन्य वाद असल्याने हा विरोध होत आहे. परंतु, जीवितहानी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
37 धोकादायक वाडे धारकांशी चर्चा करून काही पर्याय महापालिकेने सुचवले आहेत, यानंतरही विरोध होत असल्याने त्यांचे वीज आणि पाणी तोडण्यात येणार आहे. पोलिसांनाही पत्र देण्यात येत आहे. पोलिस बंदोबस्तात हे वाडे उतरविण्यात येतील. तत्पूर्वी पुन्हा नागरिकांना धोकादायक वाडे उतरवण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.