

पुणे : महानगरपालिकेने नागरिक आणि व्यावसायिकांसाठी सुलभतेच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन अद्ययावत सेवा पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलद्वारे महापालिकेच्या एकूण 97 अधिसूचित सेवांचा लाभ नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त (जनरल) एम. जे. प्रदीप चंद्रन, अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, ई-प्रशासक राहुल जगताप, तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.(Latest Pune News)
या पोर्टलद्वारे आरोग्य, मिळकतकर, पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, अग्निशमन, आकाशचिन्ह, अतिक्रमण, रस्ते, मलनिस्सारण, उद्यान अशा विभागांच्या विविध सेवा देण्यात येणार आहेत. तसेच विवाह नोंदणी, कुत्रा/मांजर परवाना, नळ जोडणी, आकाशचिन्ह परवाना, ना हरकत प्रमाणपत्र, ना देयक प्रमाणपत्र अशा नागरिकांना लागणाऱ्या महत्त्वाच्या सेवादेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नवीन पोर्टलमध्ये यूआय-यूएक्स (वापरकर्ता अनुभव) प्रणालीत सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना पोर्टलचा वापर अधिक सोपा आणि समजण्यास सुलभ झाला आहे. यात आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून त्याला अधिकारी ऑनलाइन मान्यता देतात. त्यानंतर यूपीआय, क्रेडिट कार्ड, आरटीजीएस अशा विविध माध्यमांद्वारे पैसे भरण्याची सुविधाही या पोर्टलमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या पोर्टलमध्ये सर्व प्रमाणपत्रे आणि परवान्यांवर अधिकाऱ्यांचे ई-सिग्नेचर (इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी) जोडण्यात आली आहे. नागरिकांना मंजूर प्रमाणपत्रे आणि परवाने थेट व्हॉट्स ॲपवर पाठविले जाणार आहेत. महाराष्ट्रात व्हॉट्स ॲपद्वारे अशा सेवा देणारी पुणे महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका ठरली आहे. नवीन प्रणालीमुळे नागरिकांना थेट महापालिकेच्या मुख्य कार्यालयात किंवा क्षेत्रीय कार्यालयात जाण्याची गरज नाही. सर्व सेवा पूर्णपणे ऑनलाइन मिळणार असून, यामुळे वेळ, श्रम आणि कागदपत्रांची बचत होणार आहे.