

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आता 10 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मतदार याद्यांतील गोंधळ टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून मतदारांची अचूक विभागणी आणि मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.(Latest Pune News)
महापालिका निवडणुकीसाठी सुमारे 5 हजार मतदान केंद्रांची आवश्यकता आहे. त्यासाठी योग्य जागांची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात दिवटे यांनी घेतलेल्या बैठकीत प्रभागानुसार मतदार याद्यांची विभागणी, बूथनिहाय नियोजन आणि मतदान केंद्रांची निश्चिती या मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. मतदान केंद्रांसंदर्भातील जबाबदारी उपायुक्त अरविंद माळी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत वापरलेल्या केंद्रांचा आढावा घेऊन नवीन मतदान केंद्रांची गरज व उपलब्ध जागा निश्चित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
त्रुटी टाळण्यासाठी ‘सॉफ्टवेअर’ आधारित प्रणाली
पूर्वी मतदार याद्यांची विभागणी हाताने किंवा मनुष्यबळाद्वारे केली जात होती. त्यामुळे अनेकदा एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागांत किंवा मतदान केंद्रांवर नोंदली जात होती. काही मतदारांची नावे वगळली जात असल्याच्या तक्रारीही येत होत्या. या त्रुटी टाळण्यासाठी ‘सॉफ्टवेअर’ आधारित प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीमुळे मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि त्रुटीमुक्त होणार असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. पुणेकर मतदारांना अधिक सुलभ आणि नेमकी माहिती मिळावी, यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे, असे अतिरिक्तआयुक्त दिवटे म्हणाले.