कोथरूड येथील कै. जयाबाई सुतार दवाखान्यात जाण्यासाठी भाजी मार्केटशेजारून गेल्यानंतर समोर सुतार दवाखान्याची चकाचक काचेची इमारत दिसते. प्रवेशद्वारावर गेल्यानंतर सुरक्षारक्षकाला हटकले. आत गेल्यानंतर एका खासगी संस्थेकडून चालविण्यात येणार्या विविध तपासणी केंद्रामध्ये जाता येते. या ठिकाणी असलेल्या तपासण्या कमी दरामध्ये केल्या जातात. जनरल ओपीडीसाठी जाणार्या रुग्णांना इमारतीच्या मागे वाहनतळापासून चालत जावे लागते.
एका खिडकीमध्ये केसपेपरसाठी रांग होती, समोर रुग्णांना बसण्यासाठी बैठकव्यवस्था करण्यात आली होती. तिथं भेटलेला हिमांशू पाटील हा विद्यार्थी म्हणाला, मी शिक्षणानिमित्त येथे राहतो, खासगीमध्ये जाण्यापेक्षा सुतार दवाखान्यातच माझ्यासोबतचे अनेक मित्र येथे येतात. आज गर्दी कमी आहे, केसपेपर काढण्यासाठी मोठी गर्दी असते.
केसपेपर घेतल्यानंतर आतमध्ये डॉक्टर रुग्णांची तपासणी करीत होते. गर्दी कमी असल्याने थेट डॉक्टारांकडे गेल्यानंतर लगेचच डॉक्टर चौकशी करून औषधे लिहून देत होते. डॉक्टरांच्या समोरील बाजूला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. औषधे घेण्यासाठी इमारतीसमोरील बाजूने डाव्या बाजूला गेल्यानंतर औषधालय. औषधे देणारा स्टाफ रुग्णांशी चर्चा करून औषधे देत होता. औषधालयापासून बाहेर आल्यानंतर खासगी संस्थेकडून तपासणी करून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी होती.
सुतार दवाखान्यामध्ये खासगी संस्थेकडून सुरू असलेल्या तपासणीच्या ठिकाणी इमारत एकदम चकाचक ठेवण्यात आली आहे. खासगी सुरक्षारक्षक देखील ठिकठिकाणी उभे असतात. बसण्याची व्यवस्था देखील चांगल्या दर्जाची; पण पाठीमागे महापालिकेच्या जनरल ओपीडीमध्ये एकदम साधारणपणा जाणवतो. एकाच इमारतीमध्ये हे दोन फरक स्पष्ट जाणवतात.
सीटी स्कॅन, एक्स-रे, एमआरआय, सोनोग्राफी, हृदयासंदर्भात देखील कमी दरामध्ये सुतार दवाखान्यात तपासण्या केल्या जात आहेत. लिक्विड प्रोफाईल याच्यासह रक्तांच्या विविध चाचण्या ज्यामध्ये रक्तातील साखर, हिमोग्लोबीन यांसह संसर्गजन्य आजारांचे निदान करण्यासाठी करण्यात येणार्या सर्व चाचण्या सुतार दवाखान्यात कमी दरामध्ये केल्या जातात.
चार मजली इमारत; मात्र वैद्यकीय सुविधांचा अभाव तहान लागली; पण प्यायला पाणीच नाही… लिफ्टने जायचेय; पण ती येतच नाही… तपासणीसाठी आलोय; पण डॉक्टर आणखी आलेच नाही. फेकलेल्या गोळ्या घ्यायच्या अन् पातळ औषधांसाठी बाहेर जाऊन बाटली शोधायची… अशा एक ना अनेक अडचणींना भारतरत्न राजीव गांधी रुग्णालयातील रुग्णांना सामोरे जावे लागत आहे. येरवडा येथील मुख्य चौकात असलेल्या चार मजली रुग्णालय भव्य व सुसज्ज असले तरी वैद्यकीय सुविधा मिळविण्यासाठी ते सक्षम नसल्याचे चित्र आहे.
रुग्णालयात आल्यानंतर कोठे जायचे असल्यास त्याची माहिती देण्यासाठी चौकशी कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात कक्षाव्यतिरिक्त तेथे कोणी दिसून येत नाही. कोणत्याही विभागाची चौकशी करायची असेल, तर तेथील सुरक्षारक्षक अथवा मावशींकडे विचारणा करावी लागते. रुग्णालय नऊ वाजता सुरू होते. मात्र, केसपेपर व ओपीडीमधील डॉक्टर सोडले तर अन्य विभागांत मात्र दहानंतरच डॉक्टरची वाट पाहावी लागत असल्याचे दिसून आले. चार मजली रुग्णालयात दोन मोठ्या लिफ्टची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, त्यांचा वेग कमी व सोयीनुसार बंद ठेवण्यात येत असल्याने चिमुकल्यांसह ज्येष्ठ नागरिकांनाही नाइलाजास्तव जिना चढून जावे लागते. रुग्णालयातील रुग्णांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी चांगलीच दमछाक करावी लागते.
कारण, पिण्याच्या पाण्याच्या फलकाव्यतिरिक्त रुग्णालयात पाणी अथवा प्युरिफायर दिसून येत नाही. काही ठिकाणी आहेत; मात्र तेही अपुरे असल्याने रुग्णांसह नातेवाइकांना पाण्यासाठी शोध मोहीम राबवावी लागत आहे. दुपारनंतर एक ते दीड असा वेळ जेवणासाठी ठेवण्यात आला आहे. मात्र, सव्वादोन वाजल्यानंतरही डॉक्टर न आल्याने रुग्णांना ताटकळत बसावे लागते. एकंदरीत, रुग्णालयात प्रत्येक
गोष्टीत कमतरता असल्याचे दिसून येते.
भव्य इमारत असलेल्या रुग्णालयात पॅसेजमधील कट्ट्यावर बसून प्रशिक्षित डॉक्टरांकडून तपासणी करण्याचे काम सुरू होते. स्त्री व पुरुषांची एकत्रच तपासणी होत असल्याने महिलावर्गाला या ठिकाणी तपासणी करणे अडचणीचे वाटत असल्याचे रुग्णांकडून सांगण्यात आले.
रुग्णालयाच्या आवारात भटकी कुत्री, मांजरी अन् कोंबड्यांचा सर्रास वावर दिसून येतो. जनावरे रुग्णालयाच्या मजल्यांवर येऊ नयेत, यासाठी लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या जिन्यावर ठेवण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या बसण्याच्या जागेवर भटक्या कुत्री व मांजरांनी मुक्काम ठोकला असून, त्यांना तेथून हाकलण्याची तसदीही घेतली जात नसल्याचे चित्र आहे.
थंडी-तापामुळे औषध घ्यायला आले आहे. मात्र, दोन वाजले तरी अजून कोणी नाही. जेवणाची वेळ दीडपर्यंत आहे. आत्ता दोन वाजून गेले. सरकारी दवाखान्यात उशीर हा ठरलेलाच आहे. वेळेत कोणत्याच गोष्टी कधी होत नाहीत.
– सरूबाई कांबळे
पहिल्यांदाच या दवाख्यान्यात आलो आहे. थुंकीचे नमुने द्यायचे आहेत. सकाळी नऊ वाजता दवाखाना उघडल्यानंतर आलो असून, दहा वाजता डॉक्टर येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांची वाट बघण्याखेरीज काही पर्याय नाही.
– जतीन शहा