

पुणे, पुढारी वृत्तसेवा: वर्षांपूर्वी भूमिपूजन होऊन कामाची सुरुवात झालेल्या आणि निधीअभावी रखडलेल्या कामासाठी महापालिकेकडून पुन्हा शुभारंभ कार्यक्रम घेतला. मागील वेळी 'गदिमा स्मारक भूमिपूजन' या नावाखाली कार्यक्रम घेतला होता. आता मात्र प्रशासनाने थेट गदिमा स्मारकाचे नाव पुढे न करता याच आवारात उभारल्या जात असलेल्या 'एक्झिबिशन सेंटरच्या कामाचा शुभारंभ' असे नाव देत नवा पायंडा पाडला आहे. यासंदर्भात महापालिका अधिकार्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी काहीही न बोलता तोंडावर बोट ठेवले.
महापालिकेकडून एखादा प्रकल्प सुरू केल्यानंतर त्याचे भूमिपूजन केले जाते. त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू केले जाते, तर काम संपल्यानंतर संबंधित प्रकल्पाचे उद्घाटन केले जाते. त्यासाठीचे ठराव महापालिकेच्या संबंधित समित्यांमध्ये मान्य करून त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दोन वर्षांपूर्वी 21 मार्च 2021 रोजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ग. दि. माडगूळकर स्मारकाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर थोडेफार काम झाल्यानंतर निधीअभावी पुढील काम रखडले होते.
स्मारकाचे रखडलेले काम कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. त्यामुळे प्रशासनाने तातडीने 19 मे रोजी या कामासाठीची 8 कोटींची निविदा मंजूर केली. त्यानंतर लगेचच सहा दिवसांत हे काम सुरू करण्याचा निर्णय घेत रखडलेले काम पुन्हा सुरू होत असल्याचा कार्यक्रम ठेवला आहे. मात्र, त्यासाठी प्रशासनाने थेट गदिमा स्मारकाचे नाव पुढे न करता याच आवारात उभारल्या जात असलेल्या एक्झिबिशन सेंटरचे उर्वरित काम करणेअंतर्गत गदिमा स्मारकाचे काम सुरू करणे, असा कार्यक्रम ठेवला.
स्मारकाच्या ठिकाणी आज (शनिवारी) कोनशिला लावत या कामाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते केला. महापालिकेकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे आधी भूमिपूजन, त्यानंतर काम सुरू करून ते बंद ठेवणे आणि नंतर निधी मिळाल्यावर कामाच्या शुभारंभानिमित्त कौतुक सोहळा ठेवणे, असा नवा पायंडा पाडला जात आहे. हा कार्यक्रम महापालिकेच्या भवन विभागाकडून आयोजित करण्यात आला आहे. भूमिपूजन होऊनही हा शुभारंभाचा कार्यक्रम कशासाठी? अशी विचारणा केल्यानंतर अधिकारी काहीही न बोलता केवळ राजकीय दबाव असल्याचे सांगत आहेत.