

पुणे: खडकवासला धरणातून मागील दोन वर्षांपूर्वी पाणी सोडण्यात आल्यानंतर त्याची पूर्वसूचना जलसंपदा विभागाने नागरिकांना, तसेच पालिकेला दिली नाही, त्यामुळे शहरातील सिंहगड रोड परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले होते, असा आरोप करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या पूर नियंत्रण कक्षात पालिकेचे कर्मचारी २४ तास नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. जेणेकरून खडकवासला धरणातून विसर्ग करतेवेळी त्याची माहिती त्याच वेळी पालिका प्रशासनाला कळेल, जेणेकरून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आणि संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
यासाठी नियंत्रण कक्षात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पाटबंधारे विभागाने पालिकेला १५ दिवसांपूर्वी पत्र दिले. मात्र, पालिकेने या कक्षात अजूनही मनुष्यबळाची नियुक्ती केली नसल्याची बाब समोर आली आहे.
खडकवासला धरणातून जुलै २०२४ मध्ये सुमारे २० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. जलसंपदा विभागाने पालिकेला माहिती न दिल्याने एकतानगरीमधील नागरिकांच्या घरात पाणी शिरले, अचानक पाणी आल्याने अनेक नागरिक पाण्यात अडकून पडले होते.
या वेळी खडकवासला धरणातून जादा पाणी सोडण्यात आल्याची माहिती महापालिकेला देण्यात आली होती, असा दावा पाटबंधारे विभागाने केला होता.
तर, महापालिकेचा दावा होता की, धरणातून पाणी सोडण्यात आल्याची माहिती आम्हाला दिलीच नाही. पाणी सोडण्याच्या मुद्यावरून पालिका आणि पाटबंधारे विभाग आमने-सामने होते. या दोन्ही यंत्रणामध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. याचा फटका नागरिकांना बसला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून खडकवासला पाटबंधारे विभागाच्या सिंचन भवन येथील मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षामध्ये तीन शिफ्टमध्ये पालिकेचे कर्मचारी नियुक्त केले जातात.
यंदाही या कक्षाचे कामकाज २४ तास सुरळीत चालावे आणि पुणे महानगरपालिका व पाटबंधारे विभाग यांच्यात योग्य समन्वय राहावा, यासाठी पाटबंधारे विभागाने महापालिकेकडे कनिष्ठ अभियंता दर्जाच्या कर्मचार्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. तसे पत्र पालिकेला दिले आहेत. मात्र, पालिकेकडून या कक्षासाठी अजूनही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
महापालिका व पाटबंधारे विभागात थेट संवाद हवा
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वाढल्यास शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी जलद निर्णयप्रक्रिया आणि आपत्कालीन यंत्रणांमध्ये संपर्क आवश्यक असतो.
यासाठी पालिकेने कर्मचारी नेमल्यास महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यात थेट संवाद राहिल्याने पूरपरिस्थितीची माहिती नागरिकांपर्यंत व आपत्ती व्यवस्थापन पथकांपर्यंत त्वरित पोहोचवणे शक्य होणार आहे.