Pune Road Issue: शहरात किती किलोमीटरचे रस्ते? महापालिकेच्या दोन विभागांकडे भिन्न आकडेवारी

घनकचरा विभाग म्हणतो, ६८९२ कि.मी., पथ विभाग म्हणतो, २३७१.८६ कि.मी.
Pune Road Issue
Pune Road IssuePudhari
Published on
Updated on

पुणे: महानगरपालिकेच्या दोन विभागांनी शहरातील रस्त्यांच्या लांबीबाबत दिलेली परस्परविरोधी माहिती समोर आल्याने महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. स्थायी समितीसमोर ठेवण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरात तब्बल ६८९२ कि.मी. रस्ते असल्याचे नमूद केले, तर त्याच कागदपत्रात पथ विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी महापालिका हद्दीत केवळ २३७१.८६ कि.मी. रस्ते असल्याचे स्पष्ट केले आहे.

शहरातील झाडण काम करण्यासाठी तीन महिन्यांचा पायलट प्रोजेक्ट राबविला जाणार आहे. या कामासाठी काढण्यात आलेल्या प्रशासनाच्या डॉकेटमध्ये ही माहिती उघड झाली आहे. यात शहरातील रस्त्यांच्या लांबीत मोठी तफावत आहे.

ही तफावत किरकोळ नसून, सुमारे ४५२० कि.मी.ची आहे. म्हणजेच घनकचरा विभागाच्या मते शहरात जवळपास तीनपट अधिक रस्ते आहेत. रस्त्यांची नेमकी लांबीच प्रशासनाला माहिती नसल्यास खड्डे बुजविणे, रस्ते सफाई, डांबरीकरण, देखभाल आणि निधी नियोजन कोणत्या आधारावर केले जाते, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

Pune Road Issue
Baramati Bribe Case: चार लाखांच्या लाच स्वीकारताना बारामतीचे वाहतूक नियंत्रक एसीबीच्या जाळ्यात

विशेष म्हणजे घनकचरा विभागाने सफाई कामगारांची अतिरिक्त मागणी करत ७०० मीटरमागे एक सेवक या निकषानुसार १२,१२८ सेवकांची आवश्यकता दर्शविली आहे. त्यासाठी आधार म्हणून ६८९२ कि.मी. रस्त्यांची लांबी असल्याचे डॉकेटमध्ये म्हटले आहे.

याच डॉकेटमध्ये मात्र पथ विभागाने शहरात एकूण २३७१.८६ कि.मी. लांबीचे रस्ते असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शहरात नेमके रस्ते किती लांबीचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनातील समन्वयाचा अभाव इतका गंभीर आहे की, एकाच महापालिकेतील दोन विभाग वेगवेगळे आकडे वापरत आहेत. शहराच्या मूलभूत पायाभूत सुविधांबाबतच एकवाक्यता नसल्याने स्मार्ट सिटी, खड्डेमुक्त पुणे आणि डेटा- आधारित प्रशासनाच्या दाव्यांचीही हवा निघाली आहे.

आता आयुक्तांनी दोन्ही विभागांकडून स्पष्टीकरण मागवून शहरातील अधिकृत रस्ते लांबीचा एकच प्रमाणित डेटा जाहीर करावा, तसेच चुकीची माहिती सादर करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नगरसेवक आणि नागरिकांकडून होत आहे.

Pune Road Issue
Pune Rain Update: पुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा! घाटमाथ्याला आज रेड अलर्ट; २४ जुलैनंतर पाऊस कमी होणार

४,५२० किलोमीटरचे रस्ते अतिरिक्त दाखवले फुगवून

घनकचरा विभागाने शहरात ६,८९२ कि.मी. रस्ते दाखवले. त्यापैकी ३८४ कि.मी. रस्ते मेकॅनिकल स्वीपिंगचे वगळून ६,५०८ किमी रस्त्यांवर मनुष्यबळाद्वारे झाडणकाम होत असल्याचा दावा केला. ‘दर ७०० मीटरसाठी १ कामगार’ या नियमाचा आधार घेऊन ९,२९८ कामगारांची गरज भासणार असल्याचे भासवत तब्बल ४,७०९ अतिरिक्त कामगार मंजूर करून घेतले आहे.

मात्र, पथ विभागाचे मुख्य अभियंता यांच्या अधिकृत माहितीनुसार महापालिका हद्दीतील रस्त्यांची एकूण लांबी २,३७१.८७ किमी आहे. म्हणजेच घनकचरा विभागाने कंत्राटदारांच्या फायद्यासाठी शहरात ४,५२० किलोमीटरचे रस्ते अतिरिक्त फुगवून दाखवले आहेत, असे निष्पन्न होत आहे.

...असा आला प्रकार उघडकीस

१५ क्षेत्रीय कार्यालयांमधील झाडणकामाच्या कंत्राटदारांना तीन महिन्यांची प्रायोगिक मुदतवाढ देणे आणि कामगारांच्या संख्येत वाढ करून कोट्यवधींची वाढीव देयके मंजूर करण्याचा प्रस्ताव घनकचरा विभागाने महापालिका आयुक्तांकडे सादर केला होता. मात्र, दक्षता विभागाने या प्रस्तावाची तांत्रिक तपासणी केली असता हा संपूर्ण ‘बोगस’ कारभार समोर आला.

शहरातील अधिकृत रस्त्यांची नोंद महापालिकेच्या पथ विभागाकडे आहे. त्यामुळे रस्त्यांची लांबी निश्चित करताना पथ विभागाची आकडेवारीच ग्राह्य धरली पाहिजे. घनकचरा विभागाने सादर केलेली आकडेवारी कोणत्या मापदंडांवर आणि कोणत्या पद्धतीने तयार केली, हे स्पष्ट होत नाही. त्यामध्ये खासगी सोसायट्या, लष्करी हद्दीतील किंवा अन्य खासगी रस्त्यांचा समावेश केला आहे का आणि त्या रस्त्यांवर प्रत्यक्ष झाडणकाम होणार आहे का, याचाही खुलासा प्रशासनाने करावा. दोन विभागांच्या आकडेवारीत थोडाफार फरक असू शकतो; मात्र, एवढी मोठी तफावत गंभीर आहे. हा प्रस्ताव पुरेसा अभ्यास आणि वस्तुनिष्ठ मोजमाप न करता तयार केल्याचे दिसत असून, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. हा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित करणार आहे.

- नीलेश निकम, विरोधी पक्षनेते, पुणे महापालिका

शहरात २,३७१.८७ कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. आम्ही शहरात जियो टॅगिंग वाहन फिरवून ही अधिकृत नोंदणी केली आहे. घनकचरा विभागाने कोणत्या आधारे रस्त्यांची आकडेवारी दिली आहे, याबाबत माहिती नाही.

- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त

शहरातील रस्त्यांची लांबी निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे मुकादम, आरोग्य निरीक्षक आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांनी केलेल्या पाहणीचा आधार घेण्यात आला आहे. त्यानंतर निवडणुकीसाठी तयार केलेल्या हद्दींचे नकाशे आणि गुगल मॅपच्या माध्यमातून या आकडेवारीची पडताळणी करण्यात आली. या आकडेवारीत शहरात तब्बल ९ हजार कि.मी.चे रस्ते असल्याचे निष्पन्न झाले आहे.

- संतोष वारुळे, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news