पाण्याअभावी पुणेकरांचे हाल; कपात केल्याने उपनगरांतील स्थिती

पाण्याअभावी पुणेकरांचे हाल; कपात केल्याने उपनगरांतील स्थिती
Published on
Updated on

टीम पुढारी

पुणे : एक दिवसाच्या पाणीकपातीचा परिणाम शहरात विशेषत: उपनगरांत दुसर्‍या दिवशी (शुक्रवारी) जाणवला. बहुतांशी ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. तर काही भागांत महापालिका प्रशासनाने केलेली टँकरची व्यवस्थाही तुंटपुजी ठरली. यामुळे पुरेसे पाणी न मिळाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. धायरी, कोल्हेवाडी, सिंहगड रोड परिसरात दिवसभर पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडल्याचे दिसून आले. धायरी येथील बेनकर वस्ती, रायकरमळा आदी भागात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.

या ठिकाणी सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने रहिवासी सकाळपासून पाण्याची प्रतीक्षा करीत होते. मात्र, काही भागांत सायंकाळपर्यंत पाणी आले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. नर्‍हे येथे सोसायट्यांत नळांवर पाणी भरण्यासाठी भांड्यांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी सकाळी, तर काही ठिकाणी दुपारी पाणी आले. मात्र, ते कमी दाबाने आल्याने पुरेसे पाणी न मिळाल्याचे नागरिकांनी सांगितले. परिसरात पाणीपुरवठ्याचे वितरण करताना तारेवरची कसरत करावी लागल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले.

बिबवेवाडीतील डोंगरउताराच्या भागातही सलग दोन दिवस पाणीपुरवठा न झाल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची दिवसभर वणवण सुरू होती. पाणीटंचाईमुळे काही सोसायट्यांतील नागरिकांनी खासगी टँकरचे पाणी विकत घेतले. मात्र, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड, झाला कॉम्प्लेक्स, हमालनगर, रायसोनी पार्क या भागातील झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे हाल झाले. घरात पुरेसे पाणी नसल्याने दिवसभराचे कामकाज विस्कळीत झाल्याचे मोलमजुरी करणार्‍या नागरिकांनी सांगितले.

कात्रज परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. कात्रज-कोंढवा रोड, राजीव गांधीनगर, सुखसागरनगर भाग 1 व 2, शिवशंभोनगर, कात्रज गावठाण, संतोषनगर, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागली. आंबेगाव, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी भागात टँकरद्वारे पाणी पुरवले होत आहे. मात्र, ते पुरसे नसल्याचे नागरिकांनी सांगितले. सहकारनगर, लक्ष्मीनगर, पद्मावती भागातही कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. परिरातील अनेक सोसायट्यांना खासगी टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागल्यायचे नागरिकांनी सांगितले.

मांजरी बुद्रुक परिसरात दुपारपर्यंत एकच टँकर आल्याने पाणी भरण्यासाठी त्याभोवती घरकुल योजनेसह गावठाण भागातील नागरिकांचा गराडा पडल्याचे चित्र दिसून आले. पाणी न मिळाल्याने माळवाडी, कुंजीरवस्ती, वेताळवस्ती, राजीव गांधीनगर, सटवाईनगर, 116 घरकुल व 72 घरकुल येथील भागांचे प्रचंड हाल झाले. पाण्यासाठी मांजरीकरांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. मात्र, महापालिकेकडून आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. पाण्यासाळी नागरिकांची दिवसभर भटकंती सुरू असल्याचे चित्र दिसून आले. फुरसुंगी परिसरातील नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागला.

उंड्री येथे महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. दुपारीपर्यंत या भागात टँकरच्या 14 फेर्‍या झाल्या. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत त्या अपुर्‍या असल्याचे नागरिकांनी सांगितले. सकाळी रामटेकडी येथून पाण्याचे टँकर पुरविण्यात आल्यामुळे दिलासा मिळाल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. येरवडा, धानोरी, लोहगाव, खराडी, चंदननगर, विमाननगर परिसरातही पाणीटंचाई जाणवली. त्यामुळे महापालिकेने टँकरच्या संख्येत वाढ केली. परिसरात दिवसभरात सुमारे 164 टँकरच्या फेर्‍या करण्यात आल्या.

फुरसुंगीत मुलांना उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्याऐवजी टँकरची वाट पाहात बसावे लागत आहे. महापालिकेने केलेल्या पाणीकपातीचा फटका परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. यामुळे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने अनेक नागरिकांची आर्थिक घडी विस्कळीत होत आहे.

                                                – रूपाली गोलांडे, रहिवासी, फुरसुंगी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news