Ganeshotsav 2023 : प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाचा मंडळांकडून निर्धार

Ganeshotsav 2023 :  प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाचा मंडळांकडून निर्धार
Published on
Updated on

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाचा गणेश मंडळांनी शुक्रवारी (दि. 15) निर्धार केला. दैनिक पुढारीच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला गणेश मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उत्सव काळात मंडळांनी गणेश भक्तांना प्लॅस्टिक मुक्तीची प्रतिज्ञा देण्याचा संकल्प बैठकीत केला. दैनिक पुढारी, पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलिस प्रशासन, सामाजिक संस्था तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक दैनिक पुढारी पिंपरी-चिंचवड कार्यालयात झाली.  एकत्रित बैठक झाली. या बैठकीत प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाची संकल्पना आवृत्तीप्रमुख किरण जोशी यांनी मांडली.

त्याला मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत या उपक्रमात सक्रिय सहभागी होणार असल्याचे सांगितले. बैठकीला प्रसिद्ध लेखक व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे, महापालिका उपायुक्त रवीकिरण घोडके, पर्यावरण विभागाचे सह-शहर अभियंता संजय कुलकर्णी, पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, महाराष्ट्र रिक्षापंचायतचे संस्थापक-अध्यक्ष बाबा कांबळे, उद्योजक अभय भोर, माजी नगरसेवक अमित गावडे, अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे, राजाभाऊ गोलांडे, प्रसाद शेट्टी, योगेश बाबर, दैनिक पुढारीचे वितरण व्यवस्थापक (पुणे) वैभव जाधव, पिंपरी-चिंचवड आवृत्तीचे वितरण व्यवस्थापक विजय जाधव, श्रीमंत जगताप, हनुमंत वाघेरे यांच्यासह गणेश मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दुर्गा भोर, यश जयस्वाल, प्रदीप गायकवाड, अश्विन खुडे, दिनेश गायकवाड, विक्रम कुसाळकर, लक्ष्मण शिंदे, राहुल वनवारी, महेश लांडगे, अनिकेत पवार, संदीप जाधव, शिरीष भालेकर, सोमनाथ अलंकार, रवींद्र बाईत, रोहित भाट, तुषार नामदे आदी उपस्थित होते.

प्लास्टिकला विरोध हवाच : प्रभुणे

पूर्वी आपण प्लास्टिकशिवाय उत्तम जगत होतो, हे सांगताना गिरीश प्रभुणे यांनी काही उदाहरणे सांगितले. ते म्हणाले, की प्लास्टिकशिवाय आपल्याला जगता येणार नाही, हा समज आपल्याला पुसणे गरजेचे आहे. खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी किमान प्लास्टिकमधून मिळणार नाही, याची सुरुवात तरी आपण करायला हवी. दैनिक पुढारीने प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाची मांडलेली संकल्पना स्तुत्य आहे. प्लास्टिकचा वापर हा आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे प्लास्टिक पिशव्यांवर लिहायला हवे, असे त्यांनी नमूद केले.

संकल्पना निश्चित यशस्वी होईल : पवार

दैनिक पुढारीने प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाची मांडलेली संकल्पना सर्व गणेश मंडळांकडून निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास डॉ. शिवाजी पवार यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की कापडी पिशव्यांचे वाटप व अन्य मार्गाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा होईल, या दृष्टीने नियोजन करावे.

प्लास्टिकचा पुनर्वापर गरजेचा : घोडके

प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया, त्याचा पुनर्वापर करणे आणि कमीत कमी वापर करणे अशी त्रिसूत्री आपण पाळायला हवी, असे मत रवीकिरण घोडके यांनी व्यक्त केले. गणेश मंडळांनी उत्सव काळात एक दिवस वृक्षारोपणाचा असा संकल्प करून झाडे लावावी. प्लास्टिकचा 100 टक्के वापर थांबविणे शक्य नसले तरी वापर कसा कमी करता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुनर्प्रक्रिया गरजेची

प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया गरजेची आहे, असे मत संजय कुलकर्णी यांनी मांडले. कुलकर्णी म्हणाले, 'सिंगल यूज प्लास्टिक, पुनर्वापर न होऊ शकणारे प्लास्टिक टाळायला हवे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन महापालिकेकडून मंडळांना करण्यात आले आहे. ध्वनी आणि जल प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.'

प्लास्टिकचा वापर कमी व्हावा

पर्यावरणविषयक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाचा अत्यंत चांगला विषय दैनिक पुढारीने हाती घेतला असल्याचे बाबा कांबळे यांनी नमूद केले. या उपक्रमाला आमच्या सर्व संघटनांचा पाठिंबा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल, या दृष्टीने नियोजन व्हायला हवे.

पुढारीच्या उपक्रमाचे मंडळांकडून स्वागत

योगेश बाबर म्हणाले, 'प्लास्टिक कचर्‍याचे विलगीकरण गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती करावी. 100 टक्के कापडी पिशव्या वापरणार्‍यांना करसवलत द्यावी, असे राजाभाऊ गोलांडे यांनी नमूद केले. श्रीमंत जगताप यांनी प्लास्टिक उत्पादकांवर कारवाई करण्याची मागणी केली. प्लास्टिक मुक्तीचा उपक्रम मंडळांनी राबवायला हवा, असे मत गणेश अंबिके यांनी मांडले. हनुमंत वाघेरे, सुधीर अग्रवाल यांच्यासह गणेश मंडळाच्या विविध कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.'

दैनिक पुढारीचा चांगला संकल्प

अभय भोर म्हणाले, 'प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाचा दैनिक पुढारीने चांगला संकल्प केला आहे. या उपक्रमामध्ये आपण दैनिक पुढारीसोबत आहोत. त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची आपली तयारी आहे. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हायला हवा. गणेशोत्सवाचे होणारे व्यापारीकरण थांबायला हवे.'

प्लास्टिकमुक्त उत्सवासाठी प्रयत्न हवे : शेडगे

अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे म्हणाले, 'प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाची मांडलेली संकल्पना स्तुत्य आहे. दैनिक पुढारीने उचलेलेले हे एक चांगले पाऊल आहे. प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी महापालिकेने दंड आकारणीची मोहीम राबवावी. तसेच, प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव कसा होईल, यासाठी कसोशीने प्रयत्न करावे.'

प्रतिज्ञा अन संदेश

बैठकीत मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची प्रतिज्ञा घेतली. तसेच, प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्धार केला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news