एकवीरा देवी गडावर होणार रोपे-वे

एकवीरा देवी गडावर होणार रोपे-वे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एकवीरा देवी गडावर जाण्यासाठी रोप-वे प्रस्तावित करण्यात आला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग, वनविभाग यांच्या सहकार्याने पर्यटन विभागाकडून हा प्रकल्प करण्यात येणार होता. आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यास नुकतीच राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे. एकवीरा देवीचे मंदिर सह्याद्री पर्वताच्या कुशीतील कार्ला येथील डोंगरावर आहे. पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायर्‍या चढाव्या लागतात. देवीचे मंदिर डोंगरात असून परिसरात लेणी आहेत. मंदिराचा गाभारा खूप छोटा आहे. हा परिसर देवीच्या दर्शनासह पर्यटनासाठी आणि निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते.

कार्ला येथील श्री एकवीरा देवी मंदिरात रोप -वे तयार करण्यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि इंडियन पोर्ट रेल आणि रोप- वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला होता. रोप- वे च्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक सोयींसाठी अहवाल तयार करणे, निविदा प्रक्रिया राबवणे यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि आयपीआरसीएल यांच्यात हा करार झाला होता. हा प्रकल्प 'बांधा, वापरा, हस्तांतरित करा' या तत्त्वावर सुरू करण्यात येणार होता. मात्र, आता हा प्रकल्प रस्ते महामंडळाकडून करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर म्हणाले, "लोकप्रिय तीर्थक्षेत्र असल्याने आणि जवळ कार्ला लेणी पर्यटनस्थळ असल्यामुळे या ठिकाणी रोप-वे प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत आहे. एकवीरा देवी मंदिरात दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येतात. रोप-वेमुळे एकवीरा मंदिरात भाविकांना सहज पोहोचता येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news