Pimpri News : नाकामधून फुफ्फुसात गेलेले लटकन बाहेर काढण्यात यश

Pimpri News : नाकामधून फुफ्फुसात गेलेले लटकन बाहेर काढण्यात यश
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तीन वर्षीय मुलीच्या खेळता खेळता बांगडीला असलेले लटकन चुकून नाकातून थेट फुफ्फुसात गेले. पण त्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना नव्हती. मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला पिंपरीच्या डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला आणि श्वसनलिकेला इजा न होता ती वस्तू बाहेर काढण्यात रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले. बाहेर काढलेली वस्तू ही बांगडीचे प्लास्टिकचे लटकन होते. त्यामुळे मुलीला जीवदान मिळाले.

डॉक्टरांनी प्रथमदर्शनी रुग्णांची चाचणी केली असता, असे दिसून आले की, तिला श्वास घेताना उजव्या बाजूच्या श्वसननलिकेद्वारे पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, असे समजले. तिच्या उजव्या बाजूच्या फुफ्फुसाचे आकारमान लहान होऊन ते अकार्यक्षम झाल्याचे निदान झाले. त्यानंतर फुफ्फुसाचा संसर्ग वाढला. या मुलीचे कुटुंब पुण्यात राहत आहे. सुरुवातीला ताप आणि खोकल्याचा त्रास झाल्याने या मुलीला नऊ सप्टेंबरला पिंपरीच्या डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दुपारी दोन वाजता उपचारासाठी दाखल केले होते. रात्री उशिरापर्यंत त्या मुलीच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. त्या मुलीला न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्या वेळी आई वडिलांकडून तिला काय झाले आहे, याची माहिती नक्की देऊ शकले नाही.

त्या वेळी डॉक्टरांनी एचआरसीटी करण्याचा निर्णय घेतला. 'एचआरसीटी' अहवाल आल्यानंतर डॉक्टरांची शंका खरी निघाली. तिच्या अहवालात फुफ्फुसात काहीतरी वस्तू अडकल्याचे दिसत होते. दुसर्‍याच दिवशी बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. शैलजा माने यांच्या नेतृत्वाखाली बालरोग इन्टेसिव्हिस्ट डॉ. मनोज पाटील, बालरोग शल्यविशारद डॉ. धनंजय वझे, बालरोग शल्यविशारद डॉ. प्रणव जाधव, डॉ. रश्मी पाटील, बालरोग भूलतज्ज्ञ डॉ. सोनल खटावकर, डॉ. श्वेता सिंग यांच्या पथकाने सुमारे आठ तास त्या चिमुकलीवर ब्रॉन्कोस्कोपीची प्रक्रिया केली.

या गुंतागुंतीच्या प्रक्रियेदरम्यान, मुलीचा श्वास सुरू ठेवावा, यासाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर ब्रॉन्कोस्कोपीची प्रक्रिया करण्यात आली. मुलीच्या श्वसनलिकेला कोणतीही इजा न होता तेथे अडकलेला तो बांगडीच्या प्लास्टिकचे लटकन बाहेर काढण्यात यश आले. हे मोठे आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचे होते. लटकन काढल्यानंतर फुफ्फुसाच्या उजव्या बाजूचा भाग विस्तारणे शक्य झाले. या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी सुमारे आठवडापूर्वी हा प्रकार घडल्याचे समोर आले. मुलीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे लक्षात येताच; तसेच तिला ताप आणि संसर्ग वाढल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल केले होते. ब्रॉन्कोस्कोपी केल्यानंतर तीन दिवस त्या मुलीला तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.

त्यानंतर तिची प्रकृती सुधारल्याने तिला घरी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सेवा रुग्णांना उपलब्ध करून देताना आरोग्यसेवेचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच नागरिकांना चांगले आरोग्यमयी जीवन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील म्हणाल्या की, रुग्णहिताला प्राधान्य देणारे रुग्णालय म्हणून त्या दिशेने आम्ही वाटचाल करीत आहोत. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला रुग्णालयात आल्यावर योग्य ते उपचार मिळून त्याला होणार्‍या त्रासातून त्याची सुटका व्हावी, हाच आमचा प्रयत्न आहे. रुग्णाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर त्याचे प्राण वाचविण्यात यश आले यातच आमची रुग्णाबाबतची बांधिलकी असल्याचे दिसत आहे. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत सहभागी सर्व डॉक्टर, त्यांचे सहकार्‍यांचे मी अभिनंदन करते.

विद्यापीठाचे विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील म्हणाले की, आम्ही अद्ययावत आणि उपयुक्त अशा तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर देत आहोत. परिणामी, रुग्णांना चांगल्या उपचाराबरोबरच आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखणे शक्य होत आहे. रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनीषा करमरकर म्हणाल्या की, लहान मुले खेळता खेळता कधी नाणी गिळतात तर कधी मोती, स्क्रू गिळण्याच्या घटना घडल्याचे अनेकदा पाहिले आहे. मात्र, अशा वस्तू शरीरातून बाहेर काढणे हे सोपे नसते तर ते अंत्यत गुंतागुंतीचे आव्हानात्मक अशी प्रक्रिया असते. श्वास घेण्यास त्रास होतो किंवा गिळण्यास त्रास होतो. त्यामुळे एकूणच श्वसनप्रक्रियेवर परिणाम होतो. अशाच आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी अद्ययावत उपचार सुविधा आणि तज्ज्ञ व कौशल्याने पारंगत डॉक्टरांची टीम आहेत.

लहान मुलांच्या शरीरात गेलेल्या वस्तूंचे वेळीच शोध घेतला नाही, तर गुंतागुंत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आम्ही सर्व पालकांना आवाहन करतो की, त्यांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी.

डॉ. शैलजा माने, बालरोग विभाग प्रमुख

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news