Pimpri News : देहूच्या नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वासाचा ठराव

Pimpri News : देहूच्या नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वासाचा ठराव

देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : देहूगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या नऊ नगरसेवकांनी अविश्वासाचा ठराव जिल्हाधिकारी तथा न्याय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. देहू नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 तर 2 अपक्ष सदस्य निवडून आले होते. सर्व सदस्यांचा गट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रवादी पार्टी या नावाने नोंदविण्यात आलेला आहे. तर, सभागृहात भाजपचा एक सदस्य आहे. 11 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून स्मिता चव्हाण या नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या.

नगराध्यक्षांचा मनमानी कारभार

अविश्वासाचा ठराव दाखल केला असून, त्यात नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांनी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन नगरपंचायतीचे कामकाज करणे अपेक्षित होते; परंतु नगराध्यक्षा झाल्यापासून नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी निर्णय घेऊन व कामकाज करत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या विविध योजना व सोयीसुविधा नागरिकांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नगरपंचायतीविषयी अविश्वासाचे वातावरण तयार झालेले आहे. तसेच, नगरपंचायतीच्या आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता नसल्याचे अविश्वासाच्या ठरावात म्हटले आहे.

माझ्या वार्डमधील विकासकामे थांबवून इतर वार्डातील कामे कशी होतील यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केला आहे. ज्या नगरसेवकांनी माझ्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला आहे, त्यांच्या वार्डात पाणीपुरवठा, रस्ते तसेच गटारांची कामे मोठ्या प्रमाणात करून घेतली आहेत. नगरपंचायतीच्या बैठकीत नगरसेवकांना विश्वासात घेऊन कामे केली आहेत. कुणाच्या दबावाखाली येऊन हा अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला आहे.

– स्मिता चव्हाण,
नगराध्यक्षा देहू

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news