पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : परदेशातून अत्याधुनिक वाहने येऊन दोन महिने झाले तरी, पिंपरी-चिंचवड शहरातील 18 मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या मोठ्या रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने (रोड स्वीपर मशिन) साफसफाईचे सुरू करण्यात आलेले नाही. उद्घाटनास नेत्यांची तारीख मिळत नसल्याने हे काम सुरू केले जात नाही. परिणामी, नवीन वाहने धूळखात पडली आहे. या प्रकारामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
यांत्रिक पद्धतीने रस्ते साफसफाईच्या कामासाठी एकूण 7 वर्षांसाठी 328 कोटी 95 लाख रूपये खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी 27 डिसेंबर 2022 ला मंजुरी दिली आहे. या कामासाठी चार ठेकेदारांना 30 जून 2023 ला मंजुरी देण्यात आली. परदेशातून 8 मोठी व 8 मध्यम आकाराची वाहने आणण्यासाठी ठेकेदारांना 90 दिवसांची मुदत देण्यात आली. मात्र, या वाहनांची खरेदी व आरटीओ नोंदणीस बराच वेळ गेला. नोव्हेंबर 2023 ला सर्व वाहने येऊन त्यांची आरटीओत नोंदणीप्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर लगोलग साफसफाईचे काम सुरू करणे अपेक्षित होते.
मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यंमत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्याचे महापालिका प्रशासनाने निश्चित केले. मात्र, त्या तीन नेत्यांच्या व्यस्त नियोजनामुळे त्यांची तारीख महापालिकेस मिळत नसल्याने ती वाहने धूळखात पडून आहेत. दुसरीकडे, रस्त्यांवरील धूळ व माती स्वच्छ होत नसल्याने वाहनचालकांची तसेच, पादचार्यांची गैरसोय होत आहे. वाहने असूनही रस्ते साफसफाईस सुरुवात केली जात नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा