

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील दुकाने, गोदाम, गॅरेज, बेकरी, हॉटेल, शैक्षणिक संस्था, पेट्रोल पंप, औद्योगिक व वैद्यकीय आस्थापना, मल्टिप्लेक्स, वर्कशॉप, छोटे कारखाने अशा व्यावसायिक आस्थापनांचे महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत 43 हजार आस्थापनांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. शहरात एक लाखापेक्षा अधिक आस्थापना असल्याचा अंदाज आहे.
पूर्णानगर, चिखली येथील हार्डवेअरच्या दुकानास लागलेल्या आगीत दुकान मालकासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ते चौघे दुकानातील पोटमाळ्यावरच राहण्यास होते. ही घटना 30 ऑगस्ट 2023 ला घडली.
शहरात अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये म्हणून महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने अशा आस्थापनांचे म्हणजे व्यावसायिक गाळ्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी महिला बचत गटाच्या महिलांची नेमणूक केली आहे. शहरात अशा प्रकारच्या एक लाखापेक्षा अधिक आस्थापना आहेत. आतापर्यंत एकूण 43 हजार आस्थापना व गाळ्यांचे महिलांनी सर्वेक्षण केले आहे. त्यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित केले आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या 60 प्रश्नांच्या उत्तरांची नोंद केली जाते.
आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक आस्थापनांकडे फायर सर्टिफिकेट नाही. परवान्याचे वार्षिक नूतनीकरण केलेले नाही. अनेकांकडे व्यवसाय परवाना नाही. अनेकांकडे आस्थापनेत अग्निशमन प्रतिबंधक सुरक्षा साधने नाहीत. दाटीवाटीने व्यवसाय केला जात आहे. तसेच, काही ठिकाणी लोकवस्तीत हे व्यवसाय सुरू आहेत. अशा आस्थापनांवर महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
तळवडे येथील स्पार्कल फायर कॅण्डल बनविणार्या कारखान्यात स्फोट होऊन लागलेल्या आगीत आतापर्यंत 14 महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर, एक महिला जखमी झाली आहे. या दुर्घटनेमुळे महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सर्वेक्षणाचे महत्त्व वाढले आहे. या सर्वेक्षणात काही सुधारणा करून प्रसंगी पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. या दुर्घटनेबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भात उत्तर देताना पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण राज्यात व्यावसायिक व औद्योगिक आस्थापनांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा