पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सध्या वातावरणात सातत्याने होणारा बदल हा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरत आहे. सध्या हिवाळा सुरू असताना शुक्रवारी अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, घशात खवखवणे आणि व्हायरल इन्फेक्शन वाढत आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
वातावरणातील तापमान आणि आर्द्रता यामुळे नाक, कान, घसा आणि श्वसन विकार वाढत आहेत. सध्याचे वातावरण व्हायरल इन्फेक्शनला पुरक आहे. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, कामाचा ताण जास्त आहे, शारीरिक श्रमाची कामे जास्त प्रमाणात करावी लागतात तसेच, कामाच्या ठिकाणी धुळीचे वातावरण आहे, त्यांच्या आरोग्यावर जास्त परिणाम होत आहे. सर्दी, घसा खवखवणे, गिळायला त्रास होणे आणि कोरडा खोकला आदी आजार त्यांच्यामध्ये आढळून येत आहेत.
गेल्या महिनाभरात सर्दी, कोरडा खोकला, घशात खवखवणे यांचे रुग्ण 30 ते 35 टक्क्यांनी वाढले आहेत. अचानक ढास लागणे, खोकल्याची उबळ येणे, असे त्रास रुग्णांना होताना दिसतात.
-डॉ. अविनाश वाचासुंदर,
कान-नाक-घसा तज्ज्ञ.
हेही वाचा