Pimpri News : रक्त तपासणीचा अहवाल देण्यास तब्बल सहा दिवस

Pimpri News : रक्त तपासणीचा अहवाल देण्यास तब्बल सहा दिवस

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिका रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्त तपासणीचा अहवाल मिळण्यास पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागत आहे. यामुळे आजाराचे निदान आणि त्यावरील उपचारासही उशीर होत असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, रुग्णांची गरज लक्षात घेऊन त्यांना मोबाईलवर अहवालाची सॉफ्ट कॉपी पाहता यावी, यासाठी लिंक शेअर करण्यात येते. तसेच, दोन ते तीन दिवसांत रक्त तपासणीचा अहवाल मिळत असल्याचा दावा महापालिका वैद्यकीय विभागाकडून करण्यात आला आहे.

शहरामध्ये सध्या सर्दी, खोकला आणि ताप आदींचे रुग्ण वाढले आहेत. हा आजार जास्त काळ असल्यास डॉक्टर रक्ताची चाचणी करून घेण्याचा सल्ला देतात. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रक्ताच्या काही तपासण्यांचे अहवाल येण्यासाठी तब्बल सहा दिवसांचा कालावधी लागत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य शासनाने महापालिकेच्या रुग्णालयात रक्त तपासणीचे काम ठेकेदाराला दिले आहे. महापालिकेच्या पिंपळे गुरव येथील दवाखान्यात एका रुग्णाला रक्त चाचणी केल्यानंतर सहा दिवसाने रक्ताचा अहवाल घेण्यासाठी यावे, असे नुकतेच सांगण्यात आले असून, अहवालासाठी एवढे दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्या कालावधीत रुग्णाचा आजार अधिक बळावण्याची शक्यता आहे.

नातेवाइकांची वाढते चिंता

शहरामध्ये ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे 81 बाधित रुग्ण आढळून आले होते. तर, नोव्हेंबर महिन्यात 28 दिवसांत 22 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय, नोव्हेंबरमध्ये हिवतापाचे 2 बाधित रुग्ण आढळले आहेत. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता रक्त चाचणीचा अहवाल उशिरा मिळत असल्याने उपचारासही विलंब होत असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.

रुग्णांच्या रक्त चाचणीचे नमुने घेतल्यानंतर त्यांना या अहवालाची सॉफ्ट कॉपी मोबाईलवर पाहता यावी, यासाठी लिंक शेअर करण्यात येते. किमान तिसर्‍या दिवशी याबाबतचा अहवाल मिळावा, अशा सूचना रक्त तपासणीचे काम करणार्‍या संस्थेला दिलेल्या आहेत.

– डॉ. अभयचंद्र दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news