Pimpri News : अन् रेल्वेच्या चाकातून आग! ‘सिंहगड’च्या ब्रेक यंत्रणेत बिघाड

Pimpri News : अन् रेल्वेच्या चाकातून आग! ‘सिंहगड’च्या ब्रेक यंत्रणेत बिघाड

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर धावणार्‍या सिंहगड एक्सप्रेेस या गाडीच्या ब्रेक यंत्रणेचे लायनर गरम झाल्याने सोमवार (दि. 30) रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान गाडी खंडाळा घाटातील पळसदरी येथे आल्यानंतर इंजिनाखाली आग लागण्याची घटना घडली; मात्र त्याचवेळी या गाडीतून प्रवास करणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अग्निशामक यंत्रणेतील तीन शिकाऊ कर्मचार्‍यांनी ही आग वेळीच आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. सिंहगड एक्प्रेस रेल्वेगाडीने दररोज पुणे-मुंबई प्रवास करणार्‍या चाकरमान्यांसह प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या किमान चार ते पाच हजार आहे.

सोमवारी ही गाडी नेहमीप्रमाणे पुण्याहून सुटून खंडाळा घाटातून जात होती. त्या वेळी इंजीनखाली असलेल्या ब्रेक लायनरमधून धूर निघत असल्याचे या गाडीने प्रवास करणार्‍या अग्निशामक दलातील जवानांच्या लक्षात आले. त्यामुळे गाडी थांबविण्यात आली. या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिकाऊ फायरमन भूपेश पाटील (21), नितीन ससाने (26) व विजय पाटील (24) यांनी क्षणाचाही विलंब न करता मोटरमनला गाडीतील अग्नी प्रतिरोधक (फायर एक्स्टिंग्विशर)ची मागणी केली आणि त्याद्वारे या आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे प्रवाशांच्या मनात भीती निर्माण झाली होती. मात्र, जवानांच्या मदतीमुळे संभावित दुर्घटना टळली.

सिंहगड आणि डेक्कन या गाड्यांमध्ये सर्वाधिक पासधारक प्रवाशांची संख्या आहे. मात्र, या गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड्याच्या समस्या सतत उद्भवत असल्याने प्रवाशांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होतो. त्यामुळे बर्‍याचदा लेटमार्क किंवा कार्यालयामधून प्रवाशांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. अशा अनेक समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे.

– ईक्बाल मुलाणी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड प्रवाशी संघ.

घटनेदरम्यान गाडीचे ब्रेक चाकांना घासत असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे आग लागली आणि धूर निघत होता. अशा घटनांबाबत आम्हांला माहिती असल्याने आम्ही तत्काळ आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले.

– भूपेश पाटील, शिकाऊ कर्मचारी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news