पिंपरी : पालिकेच्या वतीने खासगी शाळेतील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाते. या योजनेतून सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाच्या शाळा वगळण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला होता. त्यावरून पालक व विद्यार्थी यांनी रोष व्यक्त केल्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी त्या शाळांचा समावेश पुन्हा करण्याचा निर्णय घेतला आहे.
दहावीत 80 टक्केपेक्षा अधिक आणि बारावीत 90 टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांना 10 ते 15 हजारांचे बक्षीस देण्यात येते. ती योजना सर्व बोर्डाच्या शाळांसाठी लागू होती.
मात्र, तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी या योजनेतून सीबीएससी व आयसीएससी बोर्डाच्या शाळा वगळल्या. या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे श्रीमंत कुटुंबातील असल्याने त्यांना बक्षीस रकमेची गरज नसते, असे उत्तर आयुक्त पाटील यांनी दिले होते.
या निर्णयामुळे पालक, विद्यार्थ्यांसह लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. त्याबाबत पालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या. त्याची दखल घेऊन आयुक्त शेखर सिंह यांनी या योजनेत सीबीएससी व आयसीएससी शाळांचा समावेश केला आहे. या योजनेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत होती. ती वाढवून 30 नोव्हेंबर अशी करण्यात आली आहे. एससीसी बोर्ड, एचएससी बोर्ड तसेच, सीबीएसीसी व आयसीएससी बोर्डाच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आहे.