पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील विविध हॉटेल आणि रिसॉर्ट व्यावसायिक सज्ज झाले आहेत. डीजेच्या संगीतावर जेवणाचा आस्वाद घेत नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी सुरु झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईमध्ये उत्साह पाहण्यास मिळत आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी जेवणाचा स्पेशल मेनू निश्चित केला आहे. तसेच, लॉन्स, बँक्वेट हॉल आदी ठिकाणी लाईव्ह डीजे, आर्केस्ट्रा आदींचे आयोजन केले आहे.
2023 या सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री बर्याच जणांचे हॉटेलमध्ये जेवणाचे बेत ठरलेले आहेत. कोणत्या हॉटेलमध्ये कोणता मेनू आहे, याची तपासणी केली जात आहे. कुटुंबासाठी ओपन एअर रेस्टॉरंट सजले आहेत. तर,जोडपे,युवक-युवतींसाठी लॉन्स, बँक्वेट हॉल आदी ठिकाणी लाईव्ह डीजे, आर्केस्ट्रा आदींचे आयोजन केले आहे. त्यासाठी ठराविक शुल्क देखील निश्चित करण्यात आले आहे.
शहरातील छोटे हॉटेल आणि रेस्टॉरेंटमध्ये जागेचा अभाव असतो. त्यामुळे त्यांना डीजे किंवा अन्य व्यवस्था ठेवता येत नाही. अशा ठिकाणी लोकांना आकर्षित करण्यासाठी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या जेवणाचे विविध स्पेशल मेनू निश्चित करण्यात आले आहेत.
शहरातील हॉटेल्सबरोबरच मॉल्स देखील नववर्षाच्या स्वागतासाठी तयार झाले आहेत. या मॉल्समध्ये नववर्षाला अनुसरुन आकर्षक आणि लक्षवेधक सजावट करण्यात आली आहे. मॉल्सच्या दर्शनी बाजूला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काही मॉल्समध्ये एकीकडे खरेदीचा आनंद लुटतानाच जेवणाचा आस्वाद घेण्याची देखील सोय आहे.
हेही वाचा