Pimpri Crime News : ज्येष्ठाचे 27 लाख हिसकवणार्‍या चौघांना अटक

Pimpri Crime News : ज्येष्ठाचे 27 लाख हिसकवणार्‍या चौघांना अटक

पिंपरी : पुढारी वृतसेवा : ज्येष्ठ नागरिकाच्या चेहर्‍यावर मिरची पावडर टाकून 27 लाख 25 हजार 800 रुपयांची बॅग हिसकावून नेणार्‍या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. निगडीतील यमुनानगर येथे 14 ऑक्टोबर रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्याकडून 11 लाख 35 हजार 400 रुपयांची रोकड तसेच इतर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यात आला आहे. विशाल साहेबराव जगताप (25, रा. मोरेवस्ती, चिखली, मूळगाव संक्रापूर, ता. राहुरी, जि. अहमदनगर), लालबाबू बाजीलाल जयस्वाल (28, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. चिखली), जावेद अकबर काझी (50, रा. किवळे), अभिषेक दयानंद बोडके (19, रा. मोरेवस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रकाश भिकचंद लोढा (68, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मिरची पावडर टाकून पैशांची पिशवी हिसकावली

पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोढा यांचा मनी ट्रान्सफरचा व्यवसाय आहे. दरम्यान, 14 ऑक्टोबर रोजी ते 27 लाख 25 हजार 400 रुपये घेऊन रात्री पावणेअकराच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी लोढा यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यानंतर लोढा यांच्या चेहर्‍यावर मिरची पावडर टाकून धक्काबुक्की करून लोढा यांच्याकडील पैशांची पिशवी हिसकावून नेली.

याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकांनी समांतर तपास सुरू केला. फिर्यादी लोढा यांनी रोकड जमा केलेल्या ठिकाणांची पोलिसांनी पाहणी केली. त्यात दोन अनोळखी निष्पन्न झाले. त्यानुसार, विशाल जगताप यास पकडले. चोरीच्या रकमेपैकी विशाल याच्या वाट्यास आलेली आठ लाख एक हजार 500 रुपयांची रोकड हस्तगत केली. त्यानंतर लालबाबु, जावेद आणि अभिषेक यांनाही पोलिसांनी पकडले.

सोन्याच्या दागिन्यांची खरेदी

तांत्रिक विश्लेषणावरून संशयित धिरेंद्र हा मनोज जयस्वाल याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार धिरेंद्र याला ताब्यात घेतले. मनोज याने त्याच्याकडे 13 लाखांची रोकड ठेवली होती. त्यापैकी काही रक्कम त्याने मनोज याच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठविली. क्रेडिट कार्डचे पैसे भरले, कर्ज भरले, इतर संशयितांची विमानाचे तिकिटे काढली, तसेच सोन्याचे दागिने व एक मोबाईल फोन खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड, संतोष पाटील, सहायक निरीक्षक अंबरिश देशमुख, उपनिरीक्षक इम्रान शेख, भरत गोसावी, गणेश माने, दरोडा विरोधी पथक, युनिट 1, 2, 3, 4, खंडणी विरोधी पथक व तांत्रिक विश्लेषण विभागातील अंमलदार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news