

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवडस्टेशन येथील दवा बाजारमध्ये औषधे घेण्यासाठी येणार्या नागरिकांना सम-विषम पार्किंग लक्षात न आल्याने वाहतूक विभागाने वाहने उचलल्यानंतर दंडाचा (तडजोड शुल्क) भुर्दंड बसत आहे. शंभर रुपयांचे औषध घेण्यासाठी येणार्या नागरिकांना पार्किंगचा दंड आणि वाहन उचलून नेण्यासाठी लागणारा खर्च, असा एकूण 736 रुपयांचा दंड बसत आहे. येथे सम-विषम पार्किंग न करता रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकेरी पार्किंगची सोय करण्यात यावी, अशी मागणी औषध व्यावसायिक व नागरिक करीत आहेत. चिंचवडस्टेशन येथील दवा बाजारमध्ये घाऊक दरात औषध विक्री केली जाते. येथे जवळपास 50 औषधांची दुकाने आहेत.
दवाबाजारमध्ये प्रवेश केल्यानंतर असलेल्या रस्त्यावर सध्या सम-विषम पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. मात्र, येथे दररोज खरेदीसाठी येणारे नागरिक, किरकोळ औषध विक्रेते यांची संख्या मोठी आहे. तसेच, येथे लहान मुलांचे रुग्णालय, बँक आहे. त्याशिवाय, येथील मयूर ट्रेड सेंटर येथील इमारतीत विविध कार्यालये आहेत. औषध खरेदीबरोबरच रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण त्यांचे नातेवाईक, बँक आणि कार्यालयांतील कामासाठी येणारे नागरिक हे येथील रस्त्यावर पार्किंग करतात. येथे सम-विषम पार्किंग आहे. बर्याचदा ही बाब नागरिकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांना दंडाचा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यांना नो पार्किंगचे शुल्क 500 रुपये आणि 236 रुपये टोईंग शुल्क (जीएसटीसह) भरावे लागले.