

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्र शासनाकडून विविध तीन पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. हे पुरस्कार स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी सुरत, गुजरात येथे स्वीकारले.
केंद्राच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने सूरतमधील 'स्मार्ट शहरे : स्मार्ट शहरीकरण' परिषदेत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
पिंपरी-चिंचवडने केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव व प्रकल्प संचालक कुणाल कुमार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. या वेळी स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.
'ओपन डेटा' सप्ताहामध्ये पिंपरी-चिंचवडने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. प्लेस मेकींग या प्रकारात 75 तासांत तयार करण्यात आलेल्या पिंपळे गुरवमधील सुदर्शन नगर चौकातील 8 टू 80 पार्कला प्लेस मेकींग मॅरेथॉन विजेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ऊर्जा आणि हरित इमारती, शहरी नियोजन, हरित आवरण आणि जैवविविधता, गतिशीलता आणि हवेची गुणवत्ता, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन या पाच श्रेणींमध्ये ठरवून दिलेल्या 28 निकषांनुसार चांगली कामगिरी केल्यामुळे क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क 2.0 मध्ये 5 पैकी 4 स्टार मिळवून पर्यावरण संतुलन राखण्यात मोलाची कामगीरी केल्याबद्दल क्लायमेट चेंज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तत्पूर्वी, आयुक्त राजेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना व प्रशासनाची कार्यपध्दती याविषयी त्यांनी माहिती दिली.
तसेच, महापालिकेचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी 'पाथ-वे टू नेट झिरो' या विषयावर स्ट्रीट फॉर पिपल्स व इंडिया सायकल फॉर चेंज हे उपक्रम राबवित असताना आलेले अनुभव विषद केले.
नाविन्यतेला प्राधान्य देण्यासाठी आणि ओपन डेटाचा अवलंब करण्यासाठी 'आझादी का अमृत महोत्सव उपक्रमात ओपन डेटा' सप्ताह घेण्यात आला. स्पर्धेत 62 शहरांनी सहभाग घेतला.
त्यात सरकारी एजन्सी, शैक्षणिक संस्था, उद्योग संस्था, स्टार्ट अप्स, मीडिया हाऊसेस, तसेच नागरिकांमधील सुमारे 10 हजार भागधारकांनी सहभाग घेतला. दोन उपक्रमांमधील विविध पॅरामीटर्सच्या आधारे मूल्यमापन केल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करणार्या 10 शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडची निवड झाली आहे.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्प व उपक्रमांसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. महापालिका व स्मार्ट सिटीचे अधिकारी व कर्मचार्यानी घेतलेल्या मेहनतीमुळे हा बहुमान मिळाला आहे, असे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
https://youtu.be/1fkBjdzzX90