पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे 25 पैकी 16 प्रकल्प पूर्ण

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे 25 पैकी 16 प्रकल्प पूर्ण

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड देशात सध्या 20 व्या क्रमांकावर आहे. कंपनीच्या 25 प्रकल्पांपैकी 16 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. उर्वरित 9 प्रकल्पांचे 80 टक्के काम झाले आहे. शिल्लक कामे जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी (दि.18) सांगितले.

कंपनीच्या शहर सल्लागार समितीची बैठक पालिका भवनातील आयुक्त दालनात झाली. या वेळी स्मार्ट सिटीचीे माहिती देताना ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह म्हणाले की, शहरातील 60 पैकी 47 व्हीएमडी (व्हेरीबेल मेसेजिंग डिस्प्ले सिस्टीम) सुरू करण्यात आले आहेत. सिटी नेटवर्कचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. शहरातील 10 पैकी 8 ठिकाणी स्मार्ट पार्किंगचे काम पूर्ण असून, लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल. स्मार्ट पर्यावरण, स्मार्ट वॉटर, स्मार्ट सेव्हरेज, सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प देखील प्रगतीपथावर आहेत.

ई-सर्व्हेलन्स हा प्रकल्पाद्वारे स्त्यांवरील वाहनांवर नजर ठेवण्यात येणार आहे. जीआयएस प्रकल्पाद्वारे लिडारच्या माध्यमातून शहरातील उंच इमारती, रस्त्यांचे मोजमाप, बांधकाम यांची माहिती संकलित करून यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. गुगल मॅपप्रमाणे हे मॉडयूल काम करेल.

बैठकीस आमदार अण्णा बनसोडे व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे दोघे ऑनलाइन उपस्थित होते. तसेच, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, निमंत्रित सदस्य गोविंद पानसरे, अमित तलाठी, सिटीझन फोरम अध्यक्ष तुषार शिंदे, विद्यार्थी प्रतिनिधी दीपक पवार आदी उपस्थित होते. कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांनी स्वागत केले. किरणराज यादव यांनी आभार मानले.

शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने सुरू करा

शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने तात्काळ कार्यान्वित करा. दिल्ली व मुंबईप्रमाणे पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे नियोजन करा. शहरातील जास्तीत जास्त मुलांनी पालिका शाळांमध्ये प्रवेश घ्यावा. यासाठी विशेष प्रयत्न केले जावेत, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सूचना केली.

पालिका शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एज्युकेशन सारथी

म्युनिसिपल ई -क्लास रुम प्रकल्प पालिकेच्या 123 शाळांमध्ये सुरू आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषांचे धडे दिले जात आहे. वर्ग खोल्यांमध्ये स्मार्ट टीव्ही तसेच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एज्युकेशन सारथी सूरू करण्याचे नियोजन असून शाळांमध्ये 100 टक्के वॉटर फीटर बसविण्यात येणार आहेत, असे शेखर सिंह यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news