

पिंपरी(पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक स्कूल बसचालक सर्रासपणे नियमांना बगल देत आहेत. त्यांच्याकडून स्कूल बससाठी निश्चित केलेल्या नियमावलीचे वारंवार उल्लंघन होत असल्याची बाब उजेडात आली आहे. दरम्यान, याबाबत वेळोवेळी तपासणी करून अशा स्कूल बसचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचे आरटीओ प्रशासनाचे म्हणणे आहे.
स्कूल बस नियमावलीमधील विद्यार्थी व वाहनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. स्पीड गव्हर्नर, वैध योग्यता प्रमाणपत्र, वैध विमा प्रमाणपत्र, वाहनामध्ये परिचारक असणे, अग्निशमन यंत्रणा असणे आदी बाबींचा त्यामध्ये समावेश आहे.
शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी त्या वाहनांकडे मोटार वाहन अधिनियमाच्या कलम 74 अंतर्गत वैध कंत्राट असणे आवश्यक आहे. त्यानुसार शाळा व्यवस्थापनाच्या मालकीची आणि केवळ स्कूलबस म्हणूनच वापरण्यात येणारी वाहने त्यांच्या सुरुवातीच्या दिनांकापासून वीस वर्षांपेक्षा अधिक जुनी असता कामा नये.
स्कूल बस नियमावलीची पूर्तता करीत असल्याची तसेच शालेय विद्यार्थी वाहतुकीचा परवाना असल्याची खातरजमा करून त्यानंतरच वाहनमालकांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करणे आवश्यक आहे. तसेच, एका स्कूल बसमध्ये किती विद्यार्थी बसवावेत, याबाबतदेखील शासकीय नियमावली जाहीर केली आहे. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. विद्यार्थी व वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बसच्या नियमावलीचा अवलंब गरजेचा आहे.
हेही वाचा