पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: दिवाळीनिमित्ताने नागरिकांनी खरेदी केलेल्या वाहनांच्या नोंदणीमधून पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभाग हा दिवाळीच्या दोन दिवसांतच मालामाल झाला आहे. आरटीओला दोन दिवसांत एकूण 9 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
कोरोना आणि त्यामुळे शासनाने लादलेला लॉकडाऊन उठला असून, दोन वर्षांनंतर नागरिकांना दिवाळी सण निर्बंधमुक्त साजरा करता आला आहे. तसेच या काळात सामान्यांना वाहन खरेदी करता यावे, म्हणून वाहन उत्पादक कंपन्या सवलती ठेवतात. तसेच डीलर्सदेखील वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट देऊन वेगवेगळी बक्षिसे, 'लकी ड्रॉ'चे ही आयोजन करतात.
तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करण्याची प्रथा असल्याने अनेक नागरिकांनी चार चाकी, दुचाकी आणि इतर वाहनांची खरेदी केली आहे. यामुळे आरटीओच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाला आहे.
वाहनांच्या पसंती क्रमांकासाठी एकूण 11 अर्ज प्राप्त झाले असून, यामधून आरटीओला 63,500 रुपये प्राप्त झाले आहेत.
एरवी दर महिन्याला आरटीओला 67 कोटी रुपये तर दिवसाला 2 कोटी रुपयापर्यंत महसूल मिळतो; मात्र दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसांतच नवीन वाहन आणि वाहनांच्या पसंती क्रमांकामधून आरटीओला एकूण 9 कोटी 4 लाख 90 हजार रुपये एवढा घसघशीत महसूल मिळाला आहे.
कोरोनाच्या सावटानंतर दोन वर्षांनी दिवाळी निर्बंधमुक्तपणे साजरी करता आली आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला आहे. तसेच शनिवार आणि रविवार सुटीच्या दिवशीदेखील कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे महसुलात अधिक भर पडली आहे.
– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिं. चिं. शहर.