पिंपरी-चिंचवड : शहर परिसर औद्योगिक पट्ट्यातील ‘उद्योगी’ पोलिसांच्या रडारवर

पिंपरी-चिंचवड : शहर परिसर औद्योगिक पट्ट्यातील ‘उद्योगी’ पोलिसांच्या रडारवर
Published on
Updated on

पिंपरी : औद्योगिक पट्ट्यातील दहशत मोडून काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. कंपन्यांच्या पदाधिकार्‍यांशी इंडस्ट्रीयल ग्रीव्हीयन्स सेलच्या गुप्त बैठका सुरू आहेत. यामध्ये बोगस माथाडी आणि दादागिरी करणार्‍या स्थानिकांची कुंडली काढली जात आहे. त्यामुळे पिंपरी- चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यातील 'उद्योगी' पोलिसांच्या रडारवर आल्याचे चित्र आहे.

उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलयात अंदाजे 40 लाख इतकी लोकसंख्या येते. आळंदी- मरकळ, भोसरी, चाकण, हिंजवडी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे आयुक्तालयाच्या अखत्यारीत येतात. या ठिकाणी सुमारे दोन हजार छोट्या आणि तीनशे ते चारशे मोठ्या कंपन्या आहेत. यासह जगाच्या नकाशावर ओळख असलेली आयटीनगरीदेखील आयुक्तालयाच्या हद्दीत आहे.
येथील कंपन्यांतील कंत्राट मिळवण्यासाठी स्थानिकांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू असल्याचे पाहावयास मिळते. तसेच, माथाडीच्या नावाखाली कंपन्यांच्या पदाधिकार्‍यांवर दबाव टाकण्याचे प्रकारदेखील यापूर्वी समोर आले आहेत. असे असले तरीही कोणीही पदाधिकारी समोर येऊन तक्रार देत नाहीत. पोलिसांनी कित्येकदा आवाहन करूनही म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता इंडस्ट्रीयल ग्रीव्हीयन्स सेलच्या माध्यमातून बोगस माथाडी आणि दादागिरी करणार्‍या स्थानिकांची कुंडली काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

असे चालते सेलचे काम

उद्योग क्षेत्रात काम करणार्‍या प्रतिनिधींच्या तक्रारींचे तत्काळ निवारण व्हावे. तसेच, उद्योगांना भयमुक्त वातावरण मिळावे, यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी इंडस्ट्रीयल ग्रीव्हीयन्स सेलची स्थापना केली. खंडणीविरोधी पथकाच्या अखत्यारित एक अधिकारी आणि चार कमर्चारी नियुक्त आहेत. या सेलकडून कंपनी पदाधिकार्‍यांशी थेट संवाद साधला जातो. तसेच, पदाधिकार्‍यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप करून त्यांच्याकडून दररोज अपडेट घेतली जाते. याव्यतिरिक्त कंपन्यांच्या पदाधिकार्‍यांशी संबंध वाढवून गोपनीय माहिती संकलित केली जाते. तक्रारीसाठी स्वतंत्र मेल आयडी, व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. यातून मिळणार्‍या माहितीच्या आधारे औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांवर लक्ष ठेवले जात आहे.

माथाडी कायद्याचे ज्ञान
बहुतांश कंपन्यांच्या पदाधिकार्‍यांना माथाडी कायदा माहिती नसतो. त्यामुळे ते बोगस माथाडी करणार्‍यांच्या दबावाला बळी पडतात. त्यामुळे पोलिसांनी कंपन्यांच्या पदाधिकार्‍यांसमोर महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम 1959 चे सादरीकरण केले. यामध्ये माथाडी म्हणजे नेमके काय, कायद्यातील मार्गदर्शक सूचना काय आहेत, याचा दुरुपयोग कसा केला जातो, याबाबतची माहिती देण्यात आली.

माथाडी मंडळाचे 17 हजार नोंदणीकृत सदस्य
पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळात सुमारे 17 हजार कामगार नोंदणीकृत सदस्य आहेत. सद्यस्थितीत साधारण साडेचार हजार सदस्य कार्यरत आहेत. मंडळात नोंदणी नसलेले सदस्य दमदाटी करीत असल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

औद्योगिक क्षेत्रातील दहशत मोडून काढण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडस्ट्रीयल ग्रीव्हीयन्स सेलची स्थापना करण्यात आली आहे. कंपन्यांच्या पदाधिकार्‍यांच्या संपर्कात राहून त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे, हा यामागचा उद्देश आहे.

                                        – स्वप्ना गोरे, पोलिस उपायुक्त, पिंपरी- चिंचवड

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी स्वतः कंपन्यांच्या पदाधिकर्‍यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या; तसेच इंडस्ट्रियल ग्रीव्हीयन्स सेल देखील कंपन्यांच्या संपर्कात आहे. भयमुक्त उद्योगांसाठी ही चांगली बाब आहे.
        – कर्नल चरणजितसिंह भोगल, अध्यक्ष, हिंजवडी इंडस्ट्रियल असोशिएशन. 

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news